व्यंगचित्रात राष्ट्रध्वजातील भगव्याऐवजी काळा रंग दाखवला !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा हवाला देत एका व्यंगचित्रकाराच्या विरोधातील भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा खटला रहित केला.
‘मल्ल्याळम् मनोरमा’ या नियतकालिकाने ७० व्या स्वातंत्र्ययदिनी म. गांधी आणि भारतीय ध्वज यांचे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. यात भगव्या भागाचा वरचा भाग काळ्या रेषेने दाखवला होता. या विरोधात भाजप प्रदेश समितीच्या सरचिटणीसांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.
न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन् यांनी सुनावणीच्या वेळी सांगितले की,
१. व्यंगचित्रकाराचे छोटे रेखाचित्र ही एक शक्तीशाली दृश्य टिपणी असते, जी दर्शकांना आकर्षित करते आणि प्रेरित करते.
२. व्यंगचित्रकार हेदेखील प्रसारमाध्यमांचा एक भाग आहेत. त्यांना भारतीय राज्यघटनेतील कलम १९ (१) (ए) नुसार अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे. मूलभूत हक्क त्यांना व्यंगचित्रे आदी स्वरूपांतून त्यांची मते, कल्पना आणि सृजनशीलता व्यक्त करू देतात.
३. तथापि, हे स्वातंत्र्य राज्यघटनेच्या कलम १९(२) अंतर्गत काही निर्बंधांच्या अधीन आहे, जेणेकरून देशाची एकता आणि अखंडता यांच्यावर परिणाम होणार नाही. एका व्यंगचित्रकाराकडे छोट्या व्यंगचित्रातून बरेच काही सांगण्याची शक्ती असते.
संपादकीय भूमिकाअभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अपलाभ भारत आणि हिंदुविरोधी लोक अधिक घेतात, असेच नेहमी निदर्शनास येते ! याकडे आता केंद्र सरकारने गांभीर्याने पहायला हवे ! |