केडगाव (जिल्हा पुणे) येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथाश्रम’ बनला धर्मांतराचे केंद्र !

देशभरात विविध मार्गांनी हिंदूंचे धर्मांतर होत असतांना ते रोखण्यासाठी सरकार धर्मांतरविरोधी कायदा कधी करणार ?

केडगाव (तालुका दौंड, जिल्हा पुणे) येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथाश्रमा’तील कर्मचार्‍यांनी हिंदु खाटिक समाजातील २ अल्पवयीन मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्यांचे धर्मांतर केले. ‘या प्रकरणी वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍यांद्वारे चौकशी केली जाईल. या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल’, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधान परिषदेमध्ये दिले. या विषयावर प्रकाश टाकणारा हा लेख…!

१. ‘शारदा सदन’ आणि धर्मांतर प्रकरणाची पार्श्वभूमी

श्री. अमोल चोथे

पंडिता रमाबाई यांनी ‘शारदा सदन’ या संस्थेची स्थापना मार्च १८८९ या दिवशी मुंबईतील विल्सन महाविद्यालयाजवळ एका भाड्याच्या घरात केली होती. प्रारंभी संस्थेस १० वर्षे अमेरिकेतून आर्थिक साहाय्य मिळत होते. रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर साडेपाच वर्षांनी ‘शारदा सदन’ संस्थेची स्थापना केली. अनाथ, विकलांग आणि विधवा अशा स्त्रियांची सेवा करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली होती. २४ सप्टेंबर १८९८ मध्ये केडगाव येथील खडकाळ भूमी स्वस्तात विकत घेऊन तेथे ‘शारदा सदन’ कायमस्वरूपी बांधण्यात आले.

शारदा सदन या संस्थेच्या अनाथाश्रमातील धर्मांतर करण्यात आलेल्या दोन्ही मुलींच्या आईचे कोरोना महामारीच्या काळामध्ये निधन झाले. मुलींचे वडील व्यसनाधीन त्यामुळे त्या २ मुली मावशीकडे रहायला आल्या. तेव्हा त्यांचे वय १० वर्षे आणि ८ वर्षे असे होते. त्या दोन्ही मुली पुणे शहरातील भवानी पेठ येथील ‘बापूसाहेब पवार प्राथमिक शाळे’त येथे शिकत होत्या.

२. कथित समाजसेविकेने गोड बोलून मुलींच्या मावशींना वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी बाध्य केले !

भवानी पेठेतील या शाळेशी संलग्न ‘भारतीय समाजसेवा केंद्र, कोरेगाव पार्क’, ही सामाजिक संस्था आहे. या संस्थेतील कथित समाजसेविका संध्या वसवे यांनी या मुलींच्या मावशीशी संपर्क साधला. त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधून मुलींना वसतीगृहामध्ये (अनाथाश्रमात) प्रवेश घेण्यास सांगत गोड बोलून दबाव टाकत होत्या. ‘वसतीगृहामध्ये मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था होईल. त्यांचे भविष्य चांगले घडेल’, अशा बतावण्या करत होत्या, तसेच मुलींना वसतीगृहांमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही केव्हाही मुलींना भेटू शकता, भ्रमणभाषवर संपर्क साधू शकता, सुट्टीच्या वेळी मुलींना घरी घेऊन येऊ शकता’, असे खोटे बोलून त्या मुलींच्या मावशींना मुलींना वसतीगृहामध्ये घालण्यास बाध्य केले.

३. वसतीगृहामध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुलींना भेटण्यास मनाई !

एप्रिल २०२२ मध्ये मुलींना वसतीगृहामध्ये ठेवण्यास ‘बाल कल्याण समिती, येरवडा’ येथे अर्ज केला. त्यानंतर मुलींना भेटण्यास मावशी गेली असता त्यांना भेटू दिले नाही. त्यानंतर त्यांनी २ वर्षे प्रयत्न केला. वारंवार सुट्टीसाठी (मुलींना घरी काही काळ रहाण्यासाठी) अर्ज केले, तरी मुलींना घरी सोडले नाही. मुलींना प्रत्यक्ष वसतीगृहामध्ये भेटावयास गेल्यानंतर संस्थेतील एक व्यक्ती सोबत असायची. मुलींना ते मनमोकळेपणाने बोलू देत नसत. भ्रमणभाषद्वारेही संभाषण करू देत नसत.

४. मानसिक दबावाखाली मुली 

मुलींकडून अनाथाश्रमातील स्वच्छतागृह (सार्वजनिक शौचालय) स्वच्छ करून घेतले जात असे. आजारी पडल्यानंतरसुद्धा त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात नसत. मुलींना मारहाण करणे, वेळेत जेवण न देणे, जातीवाचक, अश्लील बोलले जात असत. त्या मुलींना आईने भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती, त्याची त्या प्रतिदिन पूजा करतात; म्हणून अनाथाश्रमातील कर्मचार्‍यांनी मारहाण करून भगवान श्रीकृष्णाची मूर्ती फोडली.

५. परदेशी निधी मिळवण्यासाठी ढोंग

जेव्हा अनाथाश्रमांमध्ये परदेशी लोक (पाहुणे) येतात. तेव्हा तेथील मुलामुलींना फाटके, खराब झालेले कपडे घातले जातात. त्यांचे केस कापून त्यांना विद्रूप केले जाते. त्यांना असे दाखवले जाते की, ‘ही मुले गरीब आहेत, त्यांचा सांभाळ करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे’, असे भासवून त्यांच्याकडून अधिक आर्थिक निधी मिळवला जातो. जेव्हा मुलांचे नातेवाईक किंवा पालक येतात, त्या वेळी मुलामुलींना चांगले, छान, नीटनेटके कपडे घातले जातात. त्यांना ‘येथे मुले आनंदाने रहात आहेत’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. अनाथाश्रमातील कर्मचारी नातेवाइकांना सांगतात, ‘‘प्रत्येक मुलीमागे आम्हांला परदेशातून पैसे येतात. तुमच्या मुलींना आम्ही परदेशांमध्ये पाठवू, त्यांचे लग्नही आम्हीच करू. तुमचा आता काही संबंध नाही.’’ असे सांगून नातेवाइकांना तेथून हुसकावून देतात.

६. ‘तीर्थ’ म्हणून ‘वाईन’चा (मद्याचा) वापर !

येशू ख्रिस्ताचे ‘तीर्थ’ म्हणून मुलींना ‘वाईन’ पाजण्याचा प्रकार केला जातो. त्यांना गलिच्छ भाषेमध्ये हिणवले जाते. ते ‘वाईन’ घेत नसतील, तर त्यांच्यावर बळजोरी केली जाते, तसेच मोठ्या मुलींना प्रतिदिन ‘वाईन’ देतात.

७. ‘बाल कल्याण समिती’तील कर्मचार्‍यांची अरेरावी !

या मुलींना अनाथाश्रमशाळेमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भातील प्रक्रिया ही शंकास्पद आहे; कारण केवळ एका सप्ताहामध्ये कोणतीही शहानिशा न करता या मुलींना अनाथाश्रम शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला. मुलींना घेऊन जाण्याकरता ‘बाल कल्याण समिती’कडे अर्ज करण्यात आला, तेव्हा तेथील कर्मचार्‍यांनी मुलींच्या नातेवाइकांना अपमानास्पद वागणूक दिली. अर्वाच्य भाषा वापरली. ‘तुम्ही खालच्या जातीचे लोक’, असे संबोधून अवहेलना केली. तेव्हा तिथे आलेल्या इतर मुलींच्या नातेवाइकांशीही ते अधिकारी अशाच पद्धतीने बोलत होते.

८. अनेक प्रयत्नांनंतर मुलींना घरी सोडले !

मुलींच्या नातेवाइकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क केला. त्यांच्या साहाय्याने ‘महिला बाल कल्याण समिती’ आणि ‘बाल कल्याण समिती’ यांच्याकडे या संदर्भामध्ये विचारणा केली. त्यानंतर काही दिवसांनी ‘तुम्ही मुलींना ४ दिवसांकरता दिवाळीसाठी सुट्टीला नेऊ शकता’, असा निरोप मिळाला.

९. गुन्हा नोंद आणि हस्तांतरण प्रक्रियेमध्ये फेरफार (पालट)

मुलींची मावशी रहात असलेल्या भागामध्ये, म्हणजे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी ‘झिरो’ तक्रार नोंद केली; मात्र गुन्हा नोंद करतांना तक्रारीतील लिखाण विचारांमध्ये न घेता, ज्या योग्य कलमांचा समावेश होणे अपेक्षित असतांना ती कलमे लावली गेली नाहीत. (टीप : ‘झिरो’ तक्रार म्हणजे कोणत्याही भागातील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची तक्रार नोंद केली जाऊ शकते. त्यानंतर पोलीस गुन्ह्याशी संबंधित पोलीस ठाण्यात ती तक्रार वर्ग करतात म्हणून तिला ‘झिरो’ तक्रार असे म्हणतात.) गुन्हा घडलेले ठिकाण हे ग्रामीण भागामध्ये असल्याने नोंदवलेला गुन्हा ‘यवत पोलीस ठाण्या’कडे वळवण्यात आला.

१०. मानवी हक्कांचे उल्लंघन

‘प्रत्येक व्यक्तीला धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्या त्या धर्मांतील रुढी, परंपरा यांचे पालन करण्यास इतरांची आडकाठी असू नये, अटकाव असू नये’, असे राज्यघटना सांगते; परंतु या २ अल्पवयीन हिंदु मुलींना बळजोरीने ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करून त्यांच्या मानवी अधिकारांवर आक्रमण केले आहे. ‘बाल कल्याण समिती’च्या सदस्यांनी तक्रारदार आणि पीडित अल्पवयीन मुलींच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत. न्याय्य भूमिका न घेता त्यांना हीन वागणूक देऊन अत्यंत खालच्या स्तरावरील भाष्य करून त्यांच्या मानवी अधिकारांचे हनन केले.

११. दौंड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक स्वप्नील जाधव यांचे स्थानांतर !

दौंड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक स्वप्नील जाधव हे सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते. अप्रत्यक्षपणे ते जिहादींना साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करत होते. उपअधीक्षक पाटील यांच्या कार्यपद्धतीविषयी आणि दौंड तालुक्यात वाढत असलेली अवैध गोहत्या, गोमांस विक्री अन् वाहतूक प्रकरणी अनेक तक्रारी आल्या होत्या, तसेच त्यांनी केडगाव (तालुका दौंड) येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन’मधील २ मुलींचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद झालेला असतांना सर्व संबंधितांवर योग्य कारवाई केली नाही. ‘पोलिसांनी अप्रत्यक्षपणे संस्था आणि संस्थाचालक यांना पाठिशी घातले’, असा आरोपही करण्यात येत होता. याची नोंद घेत शासनाने ३ जुलै २०२४ या दिवशी स्थानांतराचे आदेश काढले.

१२. ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथाश्रम’वर कठोर कारवाई व्हावी !

‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथाश्रम’ या संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि संस्थेची नोंदणी रहित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. हा अनाथाश्रम नसून हिंदु धर्मियांचे बळजोरीने ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करण्याचे ‘मिशन’ असल्याचे दिसून येते. अनाथाश्रमामध्ये असणार्‍या अन्य मुली आजही दबावाखाली असल्याने त्यांना पोलिसांकडून संरक्षण मिळावे. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेल्या मुलींचे पुढे काय होते ? त्यांची मानवी तस्करी होते का ? यांचे अन्वेषण, तसेच संस्थेचे त्वरित लेखापरीक्षण आणि पुनरावलोकन होणे आवश्यक आहे. संस्था परदेशी अर्थसाहाय्य घेते. त्याचा उपयोग धर्मांतरासाठी केला जातो का ? या संस्थेत असे इतर गैरप्रकार चालू आहेत का ? यांचेही अन्वेषण होणे आवश्यक आहे.

– श्री. अमोल चोथे, पुणे. (जुलै २०२४)

मुलींनी अनाथाश्रमाविषयी सांगितलेले भयावह वास्तव

अ. आम्ही हिंदु धर्मीय असूनही आम्हाला आणि नातेवाइकांना न सांगता आमचा ‘बाप्तिस्मा’ करून ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केले.

आ. दिवसांतून ३ वेळा येशू ख्रिस्ताची प्रार्थना करण्याची सक्ती केली जात होती.

इ. प्रत्येक रविवारी आम्हाला चर्चमध्ये प्रार्थना करण्यास घेऊन जात. आम्ही विरोध केला, तर अनाथाश्रमातील मावशी आम्हाला मारहाण करत.

ई. अनाथाश्रमातील अनेक कामे करण्यास सक्ती केली जायची. आजारी असतांनाही ती कामे करावी लागत, तसेच आम्हाला जेवणही निकृष्ट दर्जाचे देत होते.

उ. अनाथाश्रमातील महिला कर्मचार्‍यांचे ऐकले नाही, तर आम्हाला शिक्षा म्हणून ‘उघड्यावर अंघोळ करायला लावत आणि जेवणही देत नसत.’

ऊ. ‘तुम्ही खालच्या जातीच्या आहात. तुम्ही कितीही शिकल्या, तरी तुमच्यात पालट होणार नाही. तुम्हाला असेच वागवले पाहिजे’, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत.

ए. अनाथाश्रमातील मुलींना हिंदु धर्माचे रितीरिवाज, परंपरा पाळण्यास मनाई करतात. मुलींना गंध, टिकली आणि बांगड्या घालू देत नसत.

ऐ. मुलींचे पालक असतांनाही आश्रमातील कर्मचारी ‘मुलींना दत्तक द्या’, म्हणून दबाव टाकत होते.

– श्री. अमोल चोथे, पुणे.