१. अंतर्मनातून
साधकाच्या अंतर्मनातून कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. ‘हे भगवंता, ही सेवा तुझ्या कृपेने झाली. अज्ञानी आणि असमर्थ अशा माझ्याकडून तूच ही सेवा करवून घेऊन मला आनंद दिलास.’ कृतज्ञता वरवरची अथवा संख्यात्मक झाल्यास ती भगवंतापर्यंत पोचत नाही.
२. भावपूर्ण
‘आपली साधना आणि सेवा भगवंताच्या कृपेनेच झाली’, असा उत्कट भाव असला पाहिजे.
३. कर्तेपणाविरहित
भगवंताच्या आज्ञेवाचून झाडाचे एक पानही हलत नाही. असे असेल, तर आमच्या साधनेचा, सेवेचा कर्ता कोण ? कर्तेपणा अर्पण केल्याने अहं नष्ट होऊन पूर्ण शरणागतभावाकडे जाणे सुलभ होते. कोणतीही सेवा होताच आपले मन कर्तेपण स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करते. ‘गुरुदेवांना भावपूर्ण प्रार्थना केल्याने ही सेवा चांगली झाली’, हे आपण विसरतो.
४. अहंविरहित
कृतज्ञतेमुळे अहं नष्ट होऊन मन निर्मळ आणि बुद्धी सात्त्विक होते. अंतर्मुखता वाढून अंतर्मनातील संस्कारांवर नियंत्रण मिळवता येते. आपल्याला आपल्यातील बुद्धीचा अडथळा, नकारात्मक विचार, बहिर्मुख वृत्ती, तसेच अहंभाव आणि स्वभावदोष यांचे निर्मूलन करणे शक्य तरी आहे का ? साधकांची साधना योग्य रितीने व्हावी; म्हणून अनेक आश्रम आणि सेवाकेंद्रे यांची स्थापना करून घरच्यापेक्षाही अधिक सुविधा देणार्या गुरुदेवांप्रती कृतज्ञता अर्पण करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत. आपल्यासारख्या अपात्र आणि अज्ञानी जिवांच्या हाताला धरून त्यांना मोक्षापर्यंत घेऊन जाणार्या गुरुदेवांप्रती कितीही कृतज्ञता अर्पण केली, तरी ती अल्पच आहे !
५. शरणागतभावाने
कृतज्ञताभावाच्या पुढचा टप्पा म्हणजे शरणागतभाव ! येथे गुरुदेवांना संपूर्ण शरण जाऊन आपण आपला ‘मी’पणाच विसरून जातो. शरणागतभावात ‘गुरुदेवच माझी साधना आणि सेवा करत आहेत’, असा भाव जागृत असतो. पहिल्या टप्प्यात कृतज्ञता व्यक्त करतांना ‘गुरुदेवांनीच माझ्या माध्यमातून सर्व सेवा करवून घेतली’, असा आपला भाव असतो. शरणागतभावात माध्यमही नसते आणि ‘मी’पणाही नसतो. ‘सर्व तुम्हीच करून घेतले’, हा भाव असतो. ‘तुम्हीच मला अनुसंधानात ठेवले, तुम्हीच माझ्याकडून प्रार्थना आणि कृतज्ञता करवून घेतली’, असे वाटणे, म्हणजे कर्तेपणा शून्य असणे. यामुळे ‘मी’पणा पूर्ण नाहीसा होऊन जीव भगवंताला शरण जातो. कृतज्ञताभावापेक्षा शरणागतभावामुळे भगवंत लगेच प्रसन्न होतो. शरणागतभावाने जीव गुरुचरणी संपूर्णपणे समर्पित होतो.’
– पू. उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल.