सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरवलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्म ६.५.१९४२ या दिवशी नागोठणे (जिल्हा रायगड, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांचे बालपण, शालेय जीवन, वैद्यकीय शिक्षण, इंग्लडमधील वास्तव्य, जागतिक कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ आणि संमोहन उपचार संशोधक म्हणून कार्यरत असणे ते ‘जिज्ञासू-साधक-शिष्य-संत (गुरु)-सद्गुरु’ पर्यंतचा त्यांचा साधनाप्रवास या संशोधनातून पाहूया.
व्यक्तीची स्पंदने तिच्या छायाचित्रातही विद्यमान असतात. या तत्त्वानुसार परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रांत त्यांची त्या त्या काळातील स्पंदने विद्यमान आहेत. त्यांचे बालपण (वय २ वर्षे) ते ‘सद्गुरु’पदापर्यंतच्या (वय ५५ वर्षे पर्यंतच्या) त्यांच्या निवडक छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येतात. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत. (भाग १)
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाने मोजलेल्या नोंदी (वर्ष १९४४ ते १९९७)
वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१ अ. परात्पर गुरु डॉक्टर बालपणापासूनच पुष्कळ सात्त्विक असणे : सर्वसाधारण व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच असे नाही. साधना करणार्या व्यक्तीमध्ये काही प्रमाणात (१-२ मीटर) सकारात्मक ऊर्जा आढळते. परात्पर गुरु डॉक्टरांचे वय २ वर्षे असतांनाच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जा १८.२ मीटर आहे. यातून ते बालपणापासूनच पुष्कळ सात्त्विक असून त्यांची आध्यात्मिक पातळीही (टीप १) चांगली होती, असे लक्षात येते.
टीप १ – आध्यात्मिक पातळी : प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण असतात. व्यक्तीने साधना, म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी करावयाचे प्रयत्न आरंभ केल्यावर तिच्यामधील रज-तम गुणांचे प्रमाण घटू लागते आणि सत्त्वगुणाचे प्रमाण वाढू लागते. सत्त्वगुणाच्या प्रमाणावर आध्यात्मिक पातळी (स्तर) अवलंबून असते. सत्त्वगुणाचे प्रमाण जितके अधिक, तितकी आध्यात्मिक पातळी अधिक असते. सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. साधना करून ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या व्यक्तीला महर्लोकात स्थान मिळते. ६० टक्के आणि त्यापुढील आध्यात्मिक पातळी गाठलेल्या व्यक्तीला मृत्यूनंतर पुनर्जन्म नसतो. अशी व्यक्ती पुढील साधनेसाठी किंवा मानवजातीच्या कल्याणार्थ स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेऊ शकते.
निर्जीव वस्तू म्हणजे १ टक्का आणि ईश्वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी, असे गृहित धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार तिची वर्तमान आध्यात्मिक पातळी निश्चित करता येते. एका संतांना समष्टी कार्याच्या आवश्यकतेनुसार साधकांच्या आध्यात्मिक पातळीविषयी ध्यानातून उत्तरे मिळतात. त्याविषयीचे लिखाण ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येते.
१ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वय १० वर्षे ते ३२ वर्षे मधील छायाचित्रांमध्ये काही प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळून येणे : वय १० वर्षे ते ३२ वर्षे यांमधील छायाचित्रांतून परात्पर गुरु डॉक्टरांमधील सात्त्विकता थोडी न्यून होऊन त्यांच्यामध्ये काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. याचे कारण हे की, ते त्या काळात मायेतील जीवन जगत होते, उदा. शालेय जीवन, वैद्यकीय शिक्षण, इंग्लडमधील वास्तव्य, जागतिक कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ आणि संमोहन उपचार संशोधक म्हणून कार्यरत असणे आदी.
१ इ. आधुनिक वैद्यकीय शास्त्राची मर्यादा लक्षात येऊन परात्पर गुरु डॉक्टरांनी अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास करून साधना करण्यास आरंभ करणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या वय ३९ वर्षे ते ४५ वर्षे यांमधील छायाचित्रांतून त्यांच्यातील सात्त्विकता वाढत गेल्याचे लक्षात येते. परात्पर गुरु डॉक्टरांकडे येणारे काही रुग्ण पूर्ण बरे होत नव्हते. हेच रुग्ण संतांकडे जाऊन किंवा तीर्थक्षेत्री काही साधना केल्यावर मात्र पूर्ण बरे होत असल्याचे त्यांना दिसून आले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय शास्त्राची मर्यादा लक्षात आली. त्यामुळे त्यांनी जिज्ञासूवृत्तीने अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास करणे आरंभ केले, तसेच भारतभरातील अनेक संतांना भेटून त्यांचे मार्गदर्शनही घेतले. या काळात त्यांनी ‘अध्यात्मशास्त्र’ हा अप्रतिम ग्रंथ लिहिला. अध्यात्म आणि साधना यांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व जाणून त्यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी प्रत्यक्ष साधनेला आरंभ केला.
१ ई. श्री गुरूंनी सांगितलेली साधना तळमळीने केल्याने परात्पर गुरु डॉक्टरांवर गुरुकृपा होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होणे : साधना आरंभ केल्यानंतरच्या पुढील १० वर्षांत त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा २१२८ मीटर झाली; म्हणजे आधीच्या तुलनेत ती अनेक पटींनी वाढली. साधना आरंभ केल्यानंतर इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज हे परात्पर गुरु डॉक्टरांना ‘गुरु’ म्हणून लाभले. श्रीगुरूंनी सांगितलेली साधना तळमळीने केल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांवर गुरुकृपा होऊन त्यांची जलद गतीने आध्यात्मिक प्रगती होत गेली. वर्ष १९९१ मध्ये ते ‘संत (गुरु)’पदाला (टीप २) पोचले. वर्ष १९९६-१९९७ मध्ये त्यांनी महाराष्ट्र अन् गोवा, तसेच कर्नाटक या राज्यांमध्ये जाहीर सभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी लोकांना ‘साधना’ करण्याचे महत्त्व सांगितले, तसेच लोकांमध्ये धर्माभिमान जागृत केला. त्यांनी केलेल्या समष्टी साधनेमुळे वर्ष १९९७ मध्ये ते ‘सद्गुरु’पदावर (टीप ३) विराजमान झाले.
टीप २ – ‘संत (गुरु)’ : ७० टक्के आध्यात्मिक पातळीची व्यक्ती ‘संत (गुरु)’ गणली जाते. तिला देहत्यागानंतर जनलोक प्राप्त होतो.
टीप ३ – ‘सद्गुरु’ : ८० टक्के आध्यात्मिक पातळीची व्यक्ती ‘सद्गुरु’ गणली जाते. तिला देहत्यागानंतर तपलोक प्राप्त होतो.
थोडक्यात ‘परात्पर गुरु डॉक्टरांची साधना वाढत गेल्याने त्यांच्यातील चैतन्यात उत्तरोत्तर पुष्कळ वाढ होत गेली’, हे यातून लक्षात येते. परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘जिज्ञासू-साधक-शिष्य-संत (गुरु) ते ‘सद्गुरु’पदा’पर्यंतचा साधनाप्रवास सर्वांना प्रेरणादायी आहे.’
सौ. मधुरा धनंजय कर्वे, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.७.२०२४)
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |