पोट साफ न होण्यामुळे उद्भवणारी स्थिती आणि त्यावरील उपाय !

‘डॉक्टर माझ्याकडे ‘शेल्फ’वर (सामान ठेवायच्या फळीवर) पोट साफ होण्याच्या विविध औषधांच्या डब्या आहेत; पण त्या कशानेच पोट छान साफ होऊन हलके वाटत नाही मला !’, हे संभाषण किंवा वाक्य सर्वांनाच काही अंशी लागू पडत असेल इतके सर्वसामान्य झाले आहे. वर्षानुवर्षे हलकेपणा न जाणवल्यामुळे सकाळी आळस, झोप, पोटात जडपणा, कामाचा आणि व्यायामाचा उत्साह नसणे अन् मग उद्भवणारे विविध आजार (जे एकमेकांशी संबंधित आहेत, हे आपल्याला ठाऊक नसते) हे पुष्कळ सामायिक झाले आहेत. त्यावर वैद्यकीय व्यवसाय करत असतांना लक्षात आलेले काही सूत्रे येथे देत आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

 

१. पोट साफ नसण्यामध्ये खडा होणे, चिकट होणे, प्रतिदिन मलाचा वेग न येणे; वेग आला असला, तरी पूर्ण साफ न झाल्याने २-३ वेळा जावे लागणे, असे विविध प्रकार पहायला मिळतात. या सगळ्यांना एकच एक अन् केवळ रात्री पोट साफ व्हायची औषधे घेऊन पूर्ण परिणाम दिसत नाही.

वैद्या(सौ.) स्वराली शेंड्ये

२. चिकट असमाधानकारक संडास आणि जडपणा असता खाण्याचे पथ्य अन् व्यायाम आवश्यक ! आयुर्वेदात ‘पाचन’ नावाच्या संकल्पनेचा वापर करून पाचक औषधांचाही वापर करण्याची आवश्यकता.

. गाडीवरून पुष्कळ प्रवास किंवा सतत बसून काम असता, मलाचा खडा आणि पित्ताचे त्रास असतांना मूळव्याध/फिशर व्हायचा धोका अधिक असतो. अशांनी केवळ त्रिफळा/सोनामुखी यांसारखी पोट साफ व्हायची औषधे सतत घेतली असता आतड्यांचा ‘टोन’ (लवचिकता) बिघडायची आणि कोरडेपणा वाढून ‘फिशर’ वाढायची शक्यता अधिक असते. अशा वेळी वैद्यकीय सल्ल्याने २-३ प्रकारची औषधे, तूप एकत्र घ्यायची आवश्यकता असते. म्हणूनच अशा वेळी ‘ओव्हर द काऊंटर’ (वैद्यांच्या सल्ल्याविना किंवा त्यांच्या चिठ्ठीविना औषधांच्या दुकानांमधून घेतली जाणारी औषधे) औषधे काम करत नाहीत.

४. अवाजवी सलाड, कोरडे खाणे टाळावे, तसेच सर्वच अवस्थांमध्ये योगासने आणि व्यायाम अत्यावश्यक. त्याचे प्रमाण स्वतःला झेपेल आणि सोसेल तसे वाढवत नेणे.

५. कमोडचा वापर टाळणे किंवा भारतीय पद्धतीचे संडास (स्क्वेटिंग स्टूल) वापरणे ज्यामुळे आतडी गुदद्वाराच्या सरळ रेषेत येऊन मल चांगल्या पद्धतीत बाहेर पडायला साहाय्य होते.

६. गाडीवरून अधिक प्रवास असल्यास आहारात तूपाचा सुयोग्य वापर करावा. त्यात शौचाला खडा होत असल्यास आपल्या वैद्यांशी स्नेहपान/बस्ती यांविषयी बोलून घ्यावे.

जठराग्नी व्यवस्थित रहाण्याची आवश्यकता !

पोट नीट असेल, तर जठराग्नी व्यवस्थित रहाण्याची शक्यता कैकपटीने वाढते. अग्नी खराब होण्याची बाकीही अनेक कारणे आहेत. ‘अग्नी नीट असता निरोगी जीवन मिळते आणि तो नीट नसल्यास सर्व रोगांचा संभव होऊ शकतो’, हे आयुर्वेदात सांगितले आहे. ‘गट मायक्रोबायोम’ किंवा ‘आतड्यातील सूक्ष्म जिवाणूं’मधील समतोल याकडे आता अनेक संशोधनांचे लक्ष वेधले आहे. ‘प्रत्येक मोठ्या अवयवाचे आरोग्य हे पोटाच्या आरोग्यावर अवलंबून असते’, हे संशोधनातून पुढे यायला लागले, तसे तसे आयुर्वेदात तर कुठल्याही रोगावर फक्त पोटावर काम करणारी औषधे देतात (जे पूर्ण तथ्य नाही), बाकी वात, पित्त आणि कफ हे सोडून आहे तरी काय अजून ?’, ही वाक्ये बर्‍यापैकी असंबद्ध होऊ लागली आहेत; कारण त्याची प्रासंगिकता आयुर्वेद न वाचलेल्या कित्येक लोकांसमोर वेगळ्या पद्धतीत त्यांच्या भाषेत समोर यायला लागली आहे.

सध्याच्या काळात शरिरात विशेष करून शहरात दाह वाढून होणारे पालट ज्यामध्ये विविध कर्करोग, ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’सारखे (आय.बी.एस्. – पोटाचा एक आजार) आजार, वारंवार येणारा ताप, आमवात, ‘ऑटो इम्यून’ (स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती शरिरावर आक्रमण करून उद्भवणारा आजार) आजार यांचे वाढणारे लक्षणीय प्रमाण चिंताजनक नक्कीच आहे. याला रोगानुसार लगेच काम करणारी औषधे देतांनाही कुठली, किती, कधी आणि किती काळ ? या सगळ्यांमध्येही अग्नीचा विचार असतोच. पोटातील समतोल बिघडला की, पुढच्या सगळ्या चयापचयावर परिणाम होतो. ऐकायला हे सगळे अगदी ‘क्लिच’ वाटले, तरी ही तीच गोष्ट आहे ज्यावर किमान शहरी रहाणीमान असणार्‍या सगळ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे हे नक्की !

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.