वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा पाचवा दिवस (२८ जून) : उद्बोधन सत्र – मंदिरांच्या रक्षणासाठी न्यायालयीन प्रयत्न

भक्ती आणि उपासना यांची केंद्र असलेली मंदिरे आता राजकीय पक्षांची केंद्रे बनली आहेत ! – अधिवक्ता बालासुब्रह्मण्यम् कामरसु, सर्वाेच्च न्यायालय

अधिवक्ता बालासुब्रह्मण्यम् कामरसु

विद्याधिराज सभागृह : पूर्वीच्या काळात मंदिरे केवळ पूजा-पाठ यांचे केंद्र नव्हती, तर सर्वांगिण विकासाची केंद्रे होती. स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांसाठी मंदिरे शक्तीकेंद्र बनली होती. त्यामुळे इंग्रजांनी एक कायदा बनवून मंदिरांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अल्प करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंदिरामध्ये भाविकांचे येण्याचे प्रमाण अल्प झाले. त्यामुळे हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे झाले.

स्वातंत्र्यानंतर आलेल्या सरकारांनी इंग्रजांचेच धोरण अवलंबले. त्यांनी अनेक श्रीमंत मंदिरे कह्यात घेतली आणि मंदिराच्या संपत्तीची लूट चालवली. त्यामुळे मंदिरांची स्थिती सुधारण्याऐवजी अधिकच दयनीय झाली. अनेक मंदिरांच्या समित्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावून त्यांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्या कार्यकर्त्यांकडून मंदिराचे धन सरकारी योजनांसाठी सढळ हस्ते देण्यात येते. त्यामुळे आता मंदिरे भक्ती आणि उपासना यांची केंद्र राहिली नसून राजकीय पक्षांची केंद्र बनली आहेत. मंदिरांची पुनर्स्थापना करण्याचा मार्ग निश्चित कठीण आहे; पण आपले प्रयत्न वाया जाणार नाहीत. आपण मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवण्यात यशस्वी होऊ, असा मला ठाम विश्वास आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता बालासुब्रह्मण्यम् यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी केले.


जिवंत असेपर्यंत मंदिरांच्या रक्षणासाठी लढेन ! – नामराम रेड्डी, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय वानर सेना, तेलंगाणा

श्री. नामराम रेड्डी

विद्याधिराज सभागृह : वर्ष १९९२ मध्ये ‘आय्.एस्.आय्.’ या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेने मला मारण्यासाठी २ वेळा रेकी केली. मला मारण्यासाठी काही लोक आले होते; मात्र मी नव्हतो. त्यामुळे माझ्या मित्राला मारहाण करून गेले. मी नियमित जेथे जातो, त्या ठिकाणी मला मारण्यासाठी आले होते. माझ्या घरापासून १५ किलोमीटर अंतरावरील एक मंदिर मुसलमानांनी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला. या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले होते. माहिती अधिकाराचा उपयोग करून मी या मंदिराची भूमी सोडवण्यासाठी न्यायालयीन लढा दिला.

आतापर्यंत राष्ट्रीय वानर सेनेद्वारे मंदिरांची ३ सहस्र एकर भूमी मुसलमानांच्या कह्यातून सोडवली आहे. हे काम करण्यासाठीच भगवंताने मला वेळोवेळी वाचवले आहे. हनुमंत माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे आतापर्यंत एकाही मंदिराचा खटला हरलो नाही. मागील १५ वर्षांमध्ये वानर सेनेचे कार्य तेलंगाणासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्येही वाढत आहे. मंदिरांच्या रक्षणाच्या कार्यात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मला साहाय्य करत आहेत. आमचे कार्य पारदर्शक आहे. एका मोठ्या वृक्षापेक्षा छोटी-छोटी अनेक झाडे असतील, तर अधिक ऑक्सिजन मिळतो, त्याप्रमाणे विविध संघटनांच्या माध्यमातून धर्मकार्य करायला हवे; मात्र सर्वांनी एकत्र रहाणे महत्त्वाचे आहे. मंदिरांच्या रक्षणासाठी उच्च किंवा सर्वाेच्च न्यायालयात कायदेशीर लढ्यासाठी मी साहाय्य करेन. जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मंदिरांच्या रक्षणासाठी मी लढा देईन.


केरळमध्ये साम्यवादाने प्रवेश केल्यानंतर हिंदूंचा छळ चालू झाला ! – अधिवक्ता कृष्णराज आर्. एर्नाकुलम्, केरळ

अधिवक्ता कृष्णराज आर्.

विद्याधिराज सभागृह : वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सहभागी होणे हा माझ्यासाठी पुष्कळ महत्त्वाचा क्षण आहे. मी एक स्वाभिमानी हिंदु आहे. हा स्वाभिमानी हिंदूंचा मेळावा धर्माभिमानी हिंदूंना प्रेरणादायी आहे. केरळमध्ये हिंदूंना लव्ह जिहादसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केरळमधील कुठलीच हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या साहाय्याला येत नाही. केरळमध्ये साम्यवादाने प्रवेश केल्यापासून हिंदूंचा छळ चालू आहे, अशी माहिती एर्नाकुलम्, केरळ येथील अधिवक्ता कृष्णराज आर्. यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात दिली.

सर्वाेच्च न्यायालयाने एक निवाडा दिला असून त्यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्था यांनी लहानातील लहान मंदिरांचे रक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे. या निकालाच्या आधारावर मी मंदिरांच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढा चालू केला.   मंदिराच्या संपत्तीचे  रक्षण करणे, हे भक्तांचे कर्तव्य आहे आणि त्यांचा तो हक्कही आहे. राज्यातील हिंदुविरोधी सरकारने शबरीमला प्रकरणाला वेगळेच वळण दिले. सर्वाेच्च न्यायालयाने या प्रकरणी जो निर्णय दिला, त्या निर्णयाचा सरकारने अपलाभ उठवला. केरळच्या मुसलमानबहुल मल्लपूरम् जिल्ह्यातील सर्वाधिक मंदिरे जिहादी टीपू सुलतान याने  उद्ध्वस्त केली. हिंदु संघटनांनी मंदिरांच्या रक्षणासाठी सरकावर दबाव आणला पाहिजे.


ज्ञानवापी मंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळण्याचा दिवस दूर नाही ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय तथा प्रवक्ते, हिंदू फ्रंट फॉर जस्टीस

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

१. वर्ष २०२२ मध्ये ज्ञानवापी मंदिराचा खटला ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ने बाधित नसल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात या ठिकाणी ‘वजू’ (मशिदीत प्रवेश करण्यापूर्वी पाय धुण्याची जागा) करण्याच्या ठिकाणी शिवलिंग आढळले. तो या खटल्यातील निर्णायक टप्पा होता. नंदीपासून ८३ फूट अंतरावर हे शिवलिंग आहे. येथील शिवलिंगाचे सर्वेक्षण करण्याची मागणी आम्ही जिल्हा न्यायालयात केली होती. न्यायालयाने आमची याचिका फेटाळली. या विरोधात आम्ही इलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने यावर पुरातत्व विभागाचे मत मागवले. पुरातत्व विभागाने सर्वेक्षणाला मान्यता दिली; मात्र ‘अंजुमन इंतेजामिया मसाजिद कमेटी’ सर्वाेच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने शिवलिंगाच्या सर्वेक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मंदिर तोडले, तरी तेथील देवतेचे अस्तित्व समाप्त होत नाही. भगवंताचा तेथे सूक्ष्मरूपात वास असतो. शिवलिंगाचे सर्वेक्षण होईल, तेव्हा सत्य उघड होईल. तो आता दिवस दूर नाही, जेव्हा ज्ञानव्यापी मुक्त होऊन हिंदूंना तेथे पूजेचा अधिकार प्राप्त होईल.

२. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या सर्वेक्षणाला इलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘ॲडव्होकेट कमिशन’द्वारे सर्वेक्षण करण्यास मान्यता दिल्यानंतर फेब्रुवारी ते मे २०२४ या कालावधीत सर्वेक्षण झाले. श्रीकृष्ण भूमीवर दावा करणार्‍या शाही ईदगाह मशीदकडून सर्वेक्षणाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर सर्वाेच्च न्यायालयाने सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. जुलै महिन्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

भोजशाळेच्या सर्वेक्षणात सापडलेल्या देवतांच्या मूर्तींचा अहवाल जनतेपुढे ठेवू !

मध्यप्रदेशमधील भोजशाळेचे पुरातत्व विभागाकडून ९० दिवस सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये गणेश, नृसिंह, दुर्गादेवी, हनुमंत, पार्वतीमाता, परिवारासह ब्रह्मदेव, महिषासुरमर्दिनी आदी देवतांच्या मूर्ती सापडल्या. या सर्वेक्षणाचा अहवाल पुरातत्व विभागाकडून प्राप्त झाल्यावर जनतेपुढे ठेवू. भोजशाळेलाही न्याय मिळेल. तो दिवस दूर नाही, असा विश्वास अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केला.

किष्किंदा मुक्त करण्यासाठी हिंदूंची एकजूट आवश्यक !
कर्नाटकातील कोपरमधील किष्किंदा येथे हनुमंताचे जन्मस्थान आहे. वर्ष २०१८ मध्ये व्यवस्थापन करण्याया नावाखाली कर्नाटक सरकारने या भूमीचे अधिग्रहण केले आहे. किष्किंदा भूमी सरकारीकरणापासून मुक्त करणे महत्त्वाचे आहे. यासाठी हिंदूंनी एकजुटीने लढा देणे आवश्यक आहे, असेही अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी म्हटले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि हिंदु जनजागृती समिती यांमुळे कार्याला दिशा मिळाली ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मी आणि माझे वडील पू. हरि शंकर जैन हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी १२ वर्षांपासून जोडलो आहोत. प्रतिवर्षी आम्ही वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येतो. १२ वर्षांचा हा आध्यात्मिक प्रवास होता. समितीशी संपर्क आल्यानंतर माझ्या दृष्टीकोनात पालट झाला. हिंदु जनजागृती समितीने मला आणि माझ्या वडिलांना याची जाणीव करून दिली की, मंदिरांसाठीचा कायदेशीर लढा ही आमची साधना आहे. हिंदु जनजागृती समिती म्हणजे धर्मकार्याचा वटवृक्ष आहे आणि आपण त्याचा भाग आहोत. हिंदु जनजागृती समिती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. वैश्विक  अधिवेशनासाठी वर्षातून एकदा आम्ही सहभागी होतो. या अधिवेशनातील संस्कार उपयोगी पडतात. जे या महोत्सवात प्रथम सहभागी झाले आहेत, त्यांनी अनेक गोष्टी शिकून घ्याव्यात. हिंदु संघटनाचे कार्य कसे करावे ? याचे ‘हिंदु जनजागृती समिती’ हे ‘मॉडेल’ (आदर्श उदाहरण) आहे, असे गौरवोद्गार अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ यांच्याविषयी काढले.