१६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सोलापूर येथील श्री. राजन बुणगे यांना लक्षात आलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
डॉ. अजित मधुकररावजी चौधरी, प्राचार्य, यशवंतराव पॉलिटेक्निक महाविद्यालय, बीड.
१. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये विषय मांडणे
‘डॉ. अजित मधुकररावजी चौधरी हे ‘यशवंतराव पॉलिटेक्निक महाविद्यालया’चे प्राचार्य आहेत. त्यांनी ‘रोबोटेक’मध्ये ‘पी.एच्.डी.’ केली आहे. त्यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये ‘प्राचीन भारतीय विद्या आणि अध्यात्मशास्त्र’ यांसंदर्भामध्ये तुलनात्मक चित्रफीत (सी.डी.) दाखवून विषय मांडला.
२. प्रेमभाव
ते महाप्रसाद घेण्यासाठी आमची वाट पहायचे. ते आमच्या समवेत महाप्रसाद घेण्यासाठी बसायचे. तेव्हा ‘आमच्या ताटामध्ये काही अल्प आहे का ?’, हे पाहून आम्हाला पदार्थ आणून देण्याचा प्रयत्न करायचे. आमचा महाप्रसाद झाल्यानंतर ते आमचे ताट उचलण्याचा प्रयत्न करायचे.
३. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत रात्री कार्यालयीन कामे पूर्ण करून दिवसभर महोत्सवात सहभागी होणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू असतांना त्यांच्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया (ॲडमिशन्स) चालू होती. ते स्वतः प्राचार्य असल्यामुळे त्यांच्याकडे मोठे दाियत्व आहे. त्याचे नियोजन करून रात्री निवासाच्या खोलीवर गेल्यावर ते महाविद्यालयातील अन्य सहकार्यांचा पाठपुरावा करून त्यांना पुढील नियोजन करून देत असत. दिवसभर अधिवेशनाला उपस्थित राहून रात्री कामाचे नियोजन करण्यासाठी जागरण होत असूनही त्यांनी अधिवेशनाला उपस्थित रहाण्यास प्राधान्य दिले. अधिवेशनाच्या कालावधीत ते पूर्ण दिवस उपस्थित राहिले.
४. नम्रपणा
सनातनचे साधक डॉ. चौधरी यांना त्यांच्या महाविद्यालयात भेटायला गेले होते. त्या वेळी त्यांनी साधकांच्या जेवणाची व्यवस्था केली. ते स्वतः प्राचार्य असूनही त्यांनी भोजनालयातील आसंदी पुसल्या आणि त्यावर साधकांना बसायला सांगितले. यावरून त्यांच्यातील नम्रता दिसून येते.
५. गुरु आणि गुरुकार्य यांच्याप्रती भाव असणे
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांविषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी) त्यांच्या मनामध्ये पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. ‘त्यांच्यामुळे जीवनाचे साफल्य झाले आणि मी आता परिपूर्ण सनातनचाच आहे’, असे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे. ते नेहमी म्हणतात, ‘‘तुम्ही जी सेवा सांगाल, ती मी करीन.’’ एकदा काही हिंदुत्वनिष्ठ सनातनच्या साधकांना विचारत होते, ‘‘तुम्ही आश्रमात रहाता, तर तुमचे खाणे-पिणे कसे चालते ?’’ तेव्हा डॉ. चौधरी त्यांना म्हणाले, ‘‘साधकांचा योगक्षेम भगवान श्रीकृष्ण वहातो.’’
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना गुरुस्थानी मानणे
मी आणि श्री. सुनील घनवट (हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक) एकदा डॉ. चौधरी यांना भेटलो. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘माझ्या जीवनामध्ये गुरु होते. त्यांनी मला शक्तिपात दीक्षा दिली आणि मी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे; परंतु गुरूंच्या देहत्यागानंतर एक पोकळी निर्माण झाली होती. मी सनातन संस्थेच्या आश्रमात गेलो आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट झाली. तेव्हा ती सर्व उणीव किंवा पोकळी भरून निघाली. माझ्या जीवनामध्ये पुनश्च गुरुदेव आले. तेच आता माझे सर्वस्व आहेत.’’
अधिवक्ता स्वप्निल गलधर, बीड
१. आंदोलनानंतर स्वतःच्या युवा कार्यकर्त्यांना सनातन संस्थेचे कार्य, सनातनचे आश्रम आणि साधना यांविषयी माहिती सांगणे
‘अधिवक्ता स्वप्नील गलधर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला ३ दिवस उपस्थित राहिले होते. त्यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आणि सनातनचा आश्रम पुष्कळ आवडला. त्यांच्याकडे एका राजकीय पक्षाचे जिल्हा स्तरीय दायित्व आहे. ते धर्मकार्यासाठी नेहमी साहाय्य करतात. ते एकदा एका आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलनाच्या शेवटी विषय मांडतांना त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वंदन करून विषय मांडला, तसेच आंदोलन संपल्यावर त्यांनी त्यांच्या युवा कार्यकर्त्यांना सनातन संस्थेचे कार्य, सनातनचे आश्रम आणि साधना यांविषयी माहिती सांगितली.’ (क्रमश:)
– श्री. राजन बुणगे, सोलापूर (८.१०.२०२३)