हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्राच्या विरोधातील कटकारस्थाने यशस्वी होणार नाहीत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

गोव्यात २४ ते ३० जून या कालावधीत ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन !

मथुरा (उत्तरप्रदेश) : काही दिवसांपूर्वी माता वैष्णोदेवीला जाणार्‍या भाविकांच्या बसवर झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे काश्मीरमधील आतंकवाद आता हळूहळू हिंदूबहुल जम्मूच्या दिशेने सरकत असल्याचे समोर आले आहे. पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळीसह देशद्रोही आणि विदेशी शक्ती भारताला अस्थिर करण्यासाठी सक्रीय झाल्या आहेत. भारतासह जगभरात हिंदूंवर आक्रमणे वाढली आहेत. अशा वेळी हिंदूंना जातीय संघर्षात अडकवून त्यांच्यात फूट पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे; पण हिंदु राष्ट्राच्या मार्गात असे कितीही अडथळे आले किंवा कितीही कटकारस्थाने रचली गेली, तरी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे ही कटकारस्थाने यशस्वी होणार नाहीत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत केले. मथुरा येथील पी.डी. मॉडर्न पब्लिक स्कूलच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला अखिल भारत हिंदु महासभेच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती छाया गौतम उपस्थित होत्या.

डावीकडे श्रीमती छाया गौतम आणि पत्रकारांना संबोधित करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कामाला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी मांडलेली सूत्रे . . . 

१. या वेळच्या निवडणुकीच्या काळात प्रसारित झालेल्या काही सार्वजनिक अहवालांवरून हे स्पष्ट झाले आहे की, भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षांत, म्हणजे वर्ष १९५० ते २०१५ या काळात हिंदूंची लोकसंख्या अनुमाने ८ टक्क्यांनी न्यून झाली आहे, तर त्या तुलनेत मुसलमानांची लोकसंख्या वाढली आहे. याच कालावधीत देशाच्या लोकसंख्येमध्ये अनुमाने ४३.१५ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ अनैसर्गिक म्हणावी लागेल; कारण भारतात बांगलादेशी घुसखोरांसमवेत रोहिंग्या घुसखोरांची संख्या वाढत आहे. पारपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखी भारतीय नागरिकत्वाची ओळखपत्रे बनवणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे.

२. यंदा निवडणुकीतही बांगलादेशी घुसखोरांनी मतदान केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबईत अशा काही घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे या घुसखोरांनी मतदान केल्यास भारताच्या लोकशाहीसमोर संकट निर्माण होणार आहे.

३. वर्ष २०२१ मध्ये जनगणना न झाल्यामुळे तात्काळ जनगणना करून गेल्या १३ वर्षांत भारताच्या लोकसंख्येमध्ये काय पालट झाला आहे ?, हे जनतेसमोर मांडण्याची आवश्यकता आहे. यासह संपूर्ण भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी तात्काळ लागू करण्यात यावी.

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घ्यावी ! – श्रीमती छाया गौतम

श्रीमती छाया गौतम म्हणाल्या की, सनातन धर्म अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमार आणि इंडोनेशिया या देशांपर्यंत पसरला होता. भारताने ८०० वर्षे मुसलमानांची गुलामगिरी आणि १५० वर्षे ख्रिस्त्यांचा छळ सहन केला आहे. अखंड भारताचे धर्माच्या नावाखाली स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर किती तुकडे झाले ?, हे आपण पाहिले आहे. आज रोहिंग्यांना देहली, बंगाल, आसाम आणि मुंबई येथे स्थायिक करून त्यांची लोकसंख्या वाढवली जात आहे. हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. भारतमातेचे किती तुकडे होत रहाणार ? आणि किती दिवस आपण हे सहन करत रहाणार ? हिंदूंना आता जागे व्हावे लागेल आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागेल.

खालील विषयांवर होणार चर्चा !

या अधिवेशनात हिंदु राष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ञांच्या परिसंवादासह गटचर्चा होणार आहे. ‘सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा’, ‘धर्मविरोधी आणि राष्ट्रविरोधी कथानकाला प्रत्युत्तर’, ‘हिंदु समाजाच्या रक्षणासाठी उपाययोजना’, ‘हिंदु राष्ट्रासाठी घटनात्मक प्रयत्न’, ‘मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी उपाययोजना’, ‘जागतिक स्तरावर हिंदुत्ववाद’, भारताचे संरक्षण’, ‘देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हलाल अर्थव्यवस्थेवरील उपाययोजना’, ‘लँड जिहाद’, ‘काशी-मथुरा मुक्ती’, अशा विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे.

या अधिवेशनासाठी इंदूर येथील महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, ‘आंतरराष्ट्रीय वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुनानंद गिरि महाराज, छत्तीसगडमधील पाटेश्वर धामचे श्री राम बालकदासजी महात्यागी महाराज, छत्तीसगडचे शादाणी दरबारचे डॉ. युधिष्ठिरलाल महाराज इत्यादी संतांची वंदनीय उपस्थिती लाभणार आहे.

अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण !

हिंदु जनजागृती समितीच्या HinduJagruti.org या संकेतस्थळावरून या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच समितीच्या ‘HinduJagruti या यू ट्यूब चॅनेलवरून आणि facebook.com/hjshindi1 या फेसबुक खात्यावरूनही थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. जगभरातील हिंदूंनी या अधिवेशनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.

अधिवेशनाला उपस्थित रहाणार असलेले मान्यवर !

या अधिवेशनाला पू. अधिवक्ता हरि शंकर जैन, त्यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय, ‘पवनचिंतन धारा’ आश्रमाचे पू. पवन सिन्हा गुरुजी, महाराष्ट्रातील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’चे कार्यकारी अध्यक्ष श्री. रणजित सावरकर, तेलंगाणातील धर्माभिमानी आमदार टी. राजा सिंह, ‘हिंदु इकोसिस्टीम’ संघटनेचे श्री. कपिल मिश्रा, भारताचे माजी माहिती आयुक्त आणि ‘सेव्ह कल्चर सेव्ह इंडिया’चे संस्थापक श्री. उदय माहूरकर यांच्यासह ज्येष्ठ अधिवक्ता, व्यापारी, विचारवंत, लेखक, पत्रकार, मंदिरांचे विश्वस्त आणि अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय अन् सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तसेच आध्यात्मिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.