Russian Scientist Arrested : रशियामध्ये देशद्रोहाचा ठपका ठेवत आतापर्यंत १२ शास्त्रज्ञांना अटक !

व्लादिस्लाव गल्किन

मॉस्को – रशियामध्ये वर्ष २०१५ पासून आतापर्यंत एकूण १२ शास्त्रज्ञांना अटक करण्यात आली आहे. यांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. या अटकेबाबत मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. अटक करण्यात आलेले शास्त्रज्ञ हायपरसॉनिक शस्त्रांवर काम करणारे आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवून त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी व्लादिस्लाव गल्किन या शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली. गल्किन हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर काम करत होते.

१. गल्किन आणि अन्य शास्त्रज्ञ यांच्यावर हायपरसॉनिक तंत्रज्ञानाशी संबंधित कागदपत्रे विदेशात पाठवण्याचा आरोप ठेवला होता. त्यांचे सहकारी आणि वकील म्हणाले की, ते केवळ भौतिक प्रक्रियांचे अध्ययन करत होते, शस्त्रे बनवत नव्हते.

दिमित्री

२. यापूर्वी दिमित्री नावाच्या शास्त्रज्ञाचा अटकेच्या २ दिवसांनंतर मृत्यू झाला होता. त्यांनी या शस्त्रांची माहिती विदेशी गुप्तहेरांना पुरवली, असा त्यांच्यावर आरोप होता.

३. सध्या रशियातील शास्त्रज्ञांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रशियातील शास्त्रज्ञ माहितीची आदान-प्रदान करण्यासाठी विदेशातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात असतात; मात्र रशियाची गुप्तचर संस्था फेडरल सेक्युरिटी सर्व्हिसला (एफ्.एस्.बी.ला) रशियातील शास्त्रज्ञांनी विदेशातील शास्त्रज्ञांशी संपर्क ठेवणे, हा गुन्हा वाटतो.

हायपरसोनिक शस्त्रे म्हणजे काय ?

ध्वनीच्या गतीपेक्षा ५ ते २५ पट अधिक वेगाने प्रवास करणार्‍या शस्त्रांना हायपरसोनिक शस्त्रे म्हणतात. थोडक्यात ही शस्त्रे एका घंट्यात ६ सहस्र २०० किलोमीटर प्रवास करू शकतात. त्यांच्या या क्षमतेमुळेच त्यांना धोकादायक समजले जाते.