सनातनच्या ३ गुरूंवरील श्रद्धा न्यून झाल्याने साधकाला त्याचा अहंभाव वाढल्याची झालेली जाणीव आणि त्याबद्दल त्याने केलेली क्षमायाचना !

‘वर्ष २०१५ पासून मला सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ऋषींचा सत्संग लाभला. ऋषींमुळे मला तिन्ही गुरु (टीप) अवतारी जीव असल्याचे कळले. आज मला कुणी विचारले, ‘तुमची तिन्ही गुरूंवर श्रद्धा आहे का ?’, तर चिंतन केल्यावर माझ्या लक्षात येते की, श्रद्धा अपुरी आहे; कारण कठीण प्रसंगांमध्ये माझी श्रद्धा डळमळते. जशी माझी स्थिती आहे, तशी ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणार्‍या अन्य साधकांची असू शकते. गेल्या काही दिवसांमध्ये ‘तिन्ही गुरूंवरील श्रद्धा अपुरी का पडते ?’, याचे चिंतन केल्यावर जे काही शिकायला मिळाले, ते गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातनच्या तिन्ही गुरूंच्या चरणी अर्पण करत आहे.

टीप – तीन गुरु : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ.

डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि
श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

 १. अनेक प्रयत्न करून देवता, ऋषी आणि योगी यांनाही न उमगलेली श्रीविष्णूची लीला !

श्रुंगेरी मठाच्या शंकराचार्यांच्या एका विद्वान भक्ताने लिहिले आहे, ‘श्रीविष्णूला जाणणे फार अवघड आहे. ब्रह्मांड चालवणारे त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश या देवतांमध्ये श्रीविष्णु हे कडक दैवत आहे.’ त्यांचे हे वाक्य वाचल्यावर मला वाटले, ‘श्रीविष्णु हा पालनकर्ता आहे. तो संपूर्ण पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. श्रीविष्णु नियमांचे पालन करणारा आणि करवणारा मर्यादा पुरुषोत्तम आहे. एकीकडे तो लीलाधर आहे, तर दुसरीकडे तो भक्तवत्सल आहे. एकीकडे तो धर्माचे मूर्तीमंत रूप आहे, तर दुसरीकडे तो नियमांचा भंग करणारा पूर्णपुरुषोत्तम आहे. देवता, ऋषी आणि योगी त्याला जाणण्यास असमर्थ असल्यानेच त्यांनी श्रीविष्णूची भक्ती केली, त्याला प्रश्न विचारले, त्याचा सत्संग मिळवण्याचा प्रयत्न केला आणि युगानुयुगे त्याच्याकडून ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न केले. श्रीविष्णूला जाणण्याचे प्रयत्न कलियुगात आजही चालू आहेत. असा कुणीही मनुष्य नाही, ज्याला श्रीविष्णु आणि त्याची लीला पूर्ण समजली आहे.

२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे मनुष्यरूपातील श्रीमन्नारायण आहेत’, याचा विसर पडल्याने श्रद्धा न्यून होऊन साधकाचा अहंभाव वाढणे

श्री. विनायक शानभाग

श्रीविष्णु भाव-भावना आणि गुण-दोष या सर्वांच्या पलीकडे असतो. वैकुंठपती श्रीमन्नारायणामध्ये जी वैशिष्ट्ये आहेत, ती पृथ्वीवरील ज्या मानवात आढळतात, त्याचे नाव आहे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले !’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे पृथ्वीवरील अघोषित राजा आहेत. त्यांचे राज्य दिसणारे नाही; कारण ते भगवंत असून त्यांचे राज्य अनंत आहे. पृथ्वी श्रीविष्णूची आहे; म्हणून श्रीविष्णूचे पृथ्वीशी असलेले नाते अत्यंत निराळे आहे. भक्तांसाठी श्रीविष्णु मनुष्ययोनीत जन्म घेतो. मनुष्यजन्म म्हटले की जन्म, आजार, परिवार, नाते, विवाह इत्यादी आलेच. जो भगवंत कुणाच्याही अधीन नसतो, तो मनुष्यधर्माच्या अधीन असतो. तो मनुष्यासारखे नियम पाळतो, मनुष्यासारखे रहातो आणि वागतो. त्याचे वागणे मनुष्यासारखे असल्याने जवळचा मनुष्य त्याला ओळखण्यास न्यून पडतो आणि ‘तो मनुष्यरूपातील श्रीमन्नारायण हा देव आहे’, हे विसरतो. वरीलप्रमाणे मला विसर पडल्यानेच कठीण प्रसंगांत माझी श्रद्धा न्यून झाली आणि माझा अहंभाव वाढला.

३. सहजभावात असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या स्वरूपाचे विस्मरण होणे

जसे मी मनुष्यरूपातील श्रीमन्नारायणाला विसरलो, तसेच त्या श्रीमन्नारायणाची शक्ती असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचेही मला विस्मरण झाले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत सेवा करत असतांना त्या कधीही गुरुस्थानी असल्याप्रमाणे वागल्या नाहीत. त्या दोघी नेहमी सहसाधिकांप्रमाणे वागत होत्या. ‘भक्तीच्या अभावी आणि अहंभावाच्या पोटी सहसाधिकांप्रमाणे सेवारत असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या माझ्या ‘मोक्षगुरु’ आहेत’, याची जाणीव न्यून झाल्याने त्यांच्याशी माझे वागणे-बोलणे पालटले, तसेच माझ्या हृदयात त्यांच्याविषयी असलेला भाव पालटला आणि आध्यात्मिक भावाची जागा अहंभावाने घेतली; मात्र गुरु आपल्या शिष्याला कधीच सोडत नाहीत. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला माझ्यातील अहंची जाणीव करून दिली.

४. देवाच्या कृपेने सनातनच्या तीन गुरूंच्या माहात्म्याची साधकाला झालेली जाणीव !

४ अ. भूदेवीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ! : एकदा चेन्नई येथील वास्तूविशारद श्री. मुरली हे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना भेटायला आले होते. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मनुष्य भूमीवर त्याचा मालकी हक्क असल्याचे सांगत असतो; पण ती भूमी खरेतर भूदेवीचीच असते. ‘कोणत्या भूमीवर कुणी रहायचे ?’, हे भूदेवी ठरवते. तिच्या आज्ञेच्या पलीकडे काही होत नाही.’’ हे ऐकल्यावर माझ्या डोक्यात थोडासा प्रकाश पडला. वर्ष २००१ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने देवद (पनवेल) येथे सनातनच्या पहिल्या आश्रमाची निर्मिती झाली. त्यानंतर वर्ष २००४ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाचे निर्माणकार्य झाले. सध्या भूदेवीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रहात असलेला रामनाथी येथील सनातन आश्रम विहंगम रूप धारण करत आहे. अनेक ठिकाणी नवीन आश्रमांची निर्मिती होत आहे. नवीन वास्तू आणि भूमी भूदेवीच्या अधीन आहेत. पुढे त्या वास्तूमध्ये रहाणार असलेले साधक आता आपल्या दृष्टीस दिसत नसले, तरी ‘ते साधक भूदेवीच्या कृपेने योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी स्थायिक होणार’, हे मात्र सत्य आहे. ‘ज्या भूदेवीमुळे भूधन आणि रत्ने प्राप्त होतात, मनुष्याला अन्न अन् निवारा मिळतो, ती भूदेवी सनातनच्या विविध आश्रमांचे पालन-पोषण करून त्याचे योग्य परिपालन करणार’, ही माझी श्रद्धा न्यून पडली.

४ आ. श्रीदेवीस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ! : श्रीविष्णूची दुसरी शक्ती ‘श्रीदेवी’ ही सर्वसंपन्नता आणि समृद्धी यांचे प्रतीक आहे. ती श्रीविष्णूची आत्मविद्या प्रदान करणारी देवी आहे; मात्र ती महामायारूपी चंचला आहे. श्रीविष्णूला समजणे जेवढे कठीण आहे, तेवढेच त्याच्या मायेला समजणे अवघड आहे. आजपर्यंत मला सनातनच्या तीन गुरूंपैकी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा सहवास सर्वाधिक मिळाला आहे. मी त्यांच्या सहज वागण्या-बोलण्याकडे लक्ष दिल्याने माझ्या मनातील त्यांच्यातील देवत्वाची जाणीव न्यून झाली. ‘एखादी गोष्ट अशी करूया’, असे न म्हणता त्या नेहमी मला विचारत, ‘‘दादा, हे असे करायचे का ?’’ ‘सर्व नियोजन श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या इच्छेनुसार होत आहे’, हे मी भक्तीअभावी ओळखू शकलो नाही. ‘ज्या महालक्ष्मीचा कटाक्ष वैकुंठातून पृथ्वीवर पडल्याने पृथ्वीवरील जिवांना समृद्धी लाभते आणि त्यांच्या जीवनात मंगलमय घटना घडतात, त्या श्री महालक्ष्मीचे साक्षात् स्वरूप असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत असतांना कधीही कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही’, हे माझ्या लक्षात आले नाही.

‘हे भूदेवी-श्रीदेवीसहित श्रीमन्नारायणा, मी तुझ्या चरणी शरण आलो आहे. ‘तुझ्या मूळ स्वरूपाचे विस्मरण झाल्याने मी काही काळ ध्येयापासून भरकटलो’, याबद्दल मी तुझ्या चरणी क्षमायाचना करतो. हे श्रीमन्नारायणा, ‘मला परत तुझ्या चरणांशी घेऊन माझा उद्धार कर’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक. (१७.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक