हिंदु धर्म हा एकच ईश्वरनिर्मित धर्म असून अन्य सर्व पंथ आहेत ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी प्रवचने, कीर्तने अशा माध्यमांतून हिंदु धर्माची गाथा देशासह परदेशातही पोचावी, यासाठी पूर्णवेळ काम केले. त्यांचा अमेरिकेत जाण्याचा मूलभूत उद्देश ‘अमेरिकेतील हिंदू बांधवांमध्ये आपल्या मूळ धर्मस्रोताविषयी जागृती निर्माण करणे आणि प्रवाहपतित न होता त्यांनी स्वधर्मनिष्ठा टिकवावी, यासाठी यत्न करणे’, हा होता. त्यापैकी त्यांचे एक प्रवचन येथे दिले आहे.

१. हिंदु धर्माला संस्थापक नसून त्याचा निर्माताच ईश्वर आहे !

भारताचार्य सु.ग. शेवडे

हिंदु धर्म (हिंदूइझम) हा शब्द साम्यवाद (कम्युनिझम), समाजवाद (सोशॅलिझम), बौद्ध धर्म (बुद्धिझम), जैन धर्म (जैनिझम) यांसारखा उच्चारला जातो; पण हिंदु हा ‘इझम’ नाही. हा धर्म कुणीही स्थापन केलेला नाही. या धर्माचा कुणीही संस्थापक नाही. या विश्वाची निर्मिती ज्या परमात्म्याने केली, तोच स्वतः या धर्माचा संस्थापक आहे. विश्वाच्या निर्मिती बरोबरच त्याने धर्म निर्माण केला.

अन्य पंथांना त्यांचा त्यांचा कुणी तरी संस्थापक आहे. त्याला ते प्रेषित म्हणोत वा काहीही ! ज्या माणसांनी स्वतःचे विचार प्रसृत केले. ते थोर पुरुष मानवजातीच्या कल्याणासाठीच उपदेश करत होते, यात शंका नाही. त्यांनी मानवाच्या उन्नतीसाठी उपदेश केला, हे जरी खरे असले, तरी ते ‘मानवाचे विचार’ होते.

याऐवजी ‘हिंदु’ म्हणवल्या जाणार्‍या धर्माचे विचार मात्र ईश्वरी आहेत; कारण त्याचा निर्माताच ईश्वर आहे. कुणी विचारील की, ईश्वराने धर्म कसा निर्माण केला ? त्याची प्रक्रिया काय ?

२. ईश्वराने प्रत्येक पदार्थ त्याच्या निश्चित गुणधर्मांसह उत्पन्न केला !

सर्व विश्व उत्पन्न करतांना ईश्वराने प्रत्येक पदार्थ त्याच्या निश्चित गुणधर्मांसह उत्पन्न केला. लाकडाने पाण्यावर तरंगले पाहिजे. लोहचुंबकाने लोखंडाकडेच आकृष्ट झाले पाहिजे. प्रत्येक पदार्थ, प्रत्येक प्राणी, इतकेच नव्हे, तर प्रत्येक अणू-रेणूला स्वतःचे निश्चित गुणधर्म आहेत आणि ते अगदी त्याच्या उत्पत्तीबरोबर उत्पन्न झालेले आहेत. पदार्थ आणि त्यांचे गुणधर्म एकदमच उत्पन्न होत असतात. सिंह मांसाहारी आहे आणि याउलट हत्ती पक्का शाकाहारी आहे.

३. ईश्वरनिर्मित सर्व वस्तू परिपूर्ण असतात !

पार्‍याच्या मूलद्रव्याचा सर्वांत लहान भाग (ॲटम्) ८३ विद्युत्कण धारण करतो. सोन्याच्या मूलद्रव्याचा सर्वांत लहान भागामध्ये (ॲटम्मध्ये) ८१ विद्युत्कण असतात. या पदार्थांच्या गुणधर्माच्या कडक नियमातून कोणताही पदार्थ सटकू शकत नाही. हे नियम ईश्वरनिर्मित आहेत. मानवनिर्मित नाहीत. मानवनिर्मित कायदे असे परिपूर्ण नसतात. या सर्व पदार्थांच्या सर्व गुणधर्मांचे संपूर्ण ज्ञान कुणाही मानवाला असणे कदापि शक्य नाही. संपूर्ण सृष्टीतील सर्व वैश्विक शक्ती कुणीही जाणणे शक्य नाही.

या पदार्थांच्या सर्वच गुणधर्मांचे पूर्ण ज्ञान असून त्यांचा उपयोग जगाच्या शाश्वत कल्याणार्थ कसा करावा, हे ईश्वराविना अन्य कुणाला ज्ञात असेल ? दुसरा कोण ते जगाला सांगू शकेल ? उलट ‘हे सर्व विश्व आणि त्यांच्या वैश्विक शक्ती उत्पन्न करणार्‍यावर त्यांचा उपयोग कसा करावा ?’, हे जगाला सांगण्याची आणि मार्गदर्शन करण्याचे दायित्व आपोआपच आमच्यावर येऊन पडते. हेच सर्व ज्ञान वेदांमध्ये आहे; म्हणून वेद हाच धर्मग्रंथ आणि ‘वैदिक’ हाच आमचा धर्म.

४. विज्ञानात प्रतिदिन नवे नवे शोध लावत असल्याने ते परिपूर्ण नसणे

आता लोक असे म्हणतात की, विज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत आहे. ते प्रतिदिन नवे नवे शोध लावत आहे. तेव्हा आपण त्या विज्ञानावर विसंबायला हवे; पण हे खरे आहे का ? पदार्थविज्ञान पूर्णत्वाला पोचले आहे का ?

भौतिकशास्त्रज्ञ आईनस्टाईन आपल्या एका लेखात म्हणतो, ‘ज्याला आपण ‘भौतिक जग’ म्हणतो, ते खरोखरच भौतिक आहे का ? तशी आपल्याला निश्चिती झाली आहे का ? विज्ञानाचा अत्याधुनिक दृष्टीकोन असा आहे की, ते तसे नाही. ‘पदार्थ’ हा शब्दच फसवा आहे. हे जग आध्यात्मिक जग आहे आणि ते आपल्या कार्यवाहीसाठी पदार्थांचा केवळ उपयोग करत आहे.’

५. परिपूर्ण, सैद्धांतिक आणि शास्त्रीय ज्ञान हा धर्माचा पाया असल्याने फक्त हिंदु धर्म हा एकच धर्म आहे !

धर्म हा ज्ञानावर उभारलेला आहे. परिपूर्ण, सैद्धांतिक आणि शास्त्रीय ज्ञान हा धर्माचा पाया आहे. ते ज्ञान ईश्वरीय आहे. अर्थात् वेदांद्वारे आकलनीय आहे; म्हणून आम्ही वैदिक आहोत आणि जगात हा एकच धर्म असू शकतो. अन्य सर्व पंथ आहेत.

– विश्व हिंदु संमेलनातील प्रवचनातून, बॅटनरूज (ल्युझियाना) (६.७.१९८०)

विज्ञान आणि ज्ञान 

‘आईनस्टाईनचे पुढील विचार खरोखर चिंतनीय आहेत. आईनस्टाईन एका लेखात म्हणतो, ‘विज्ञान ज्ञानापासून फार दूर असते. विज्ञान प्रायोगिक, तर ज्ञान सैद्धांतिक आहे. विज्ञान गतीमान, तर ज्ञान स्थितीमान आहे. ‘सतत पालट होत रहाणे’, हेच विज्ञानाचे लक्ष आहे. ‘त्वञ् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।’ म्हणजे ‘तू ज्ञान (ब्रह्माचे ज्ञान) आणि विज्ञान (ऐहिक जगताचे ज्ञान) यांमध्ये आहेस.’ या ठिकाणी वापरलेला ‘विज्ञान’ हा शब्द, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, अनुभवसिद्ध ज्ञान आणि आज तोच विज्ञान हा शब्द वेगळ्याच अर्थाने प्रतीत होत आहे.

विज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान !

प्रत्येक प्रगतीसह विज्ञान सिद्ध करते की, आपण कसे चूक होतो ! हे अर्धवट, बिनबुडाचे भौतिक शास्त्र, मानवाचे शाश्वत कल्याण कधीच करू शकणार नाही. त्याला स्वतःची प्रगती ‘ज्ञान’ या अवस्थेपर्यंत करून घ्यायला हवी. विज्ञान जेव्हा ज्ञान बनते, तेव्हाच ते कल्याणकारी होऊ शकते.

– विश्व हिंदु संमेलनातील प्रवचनातून, बॅटनरूज (ल्युझियाना) (६.७.१९८०)