पाकिस्तानी सैन्याने दडपशाहीचा वापर करून राजकीय शक्ती म्हणून संपवलेले इम्रान खान !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी

१. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात १४ वर्षे शिक्षा

‘पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात १४ वर्षांच्या कारावासाची, तर त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षांची शिक्षा झाली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना १९० दशलक्ष पौंडचा (५०० कोटी पाकिस्तानी रुपयांचा) भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ‘अल्-कादिर ट्रस्ट’ प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश नसीर जावेद राणा यांनी या प्रकरणातील निवाडा दिला.

इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून रावळपिंडी येथील कारागृहात आहेत. या काळात आर्थिक अपव्यवहाराच्या संदर्भात या खटल्यातील आलेला निवाडा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा निवाडा आहे. ‘इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा यांना वर्ष २०१८ ते २०२२ च्या कार्यकाळात एका भूमी विकासकाने (लँड डेव्हलपरने) अवैध लाभांच्या बदल्यात काही भूमी भेट दिली’, असा आरोप होता. इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीने हे आरोप फेटाळले आहेत. या काळात इम्रान खान यांचा पक्ष आणि सरकार यांच्यात चालू असलेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर या शिक्षेची सुनावणी ३ वेळा पुढे ढकलण्यात आली होती.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

‘जिओ न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार बुशरा बीबी जामिनावर कारागृहाच्या बाहेर होत्या. त्यांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि नंतर कह्यात घेण्यात आले. ‘आम्ही न्यायालयाच्या सविस्तर निवाड्याची प्रतिक्षा करत आहोत; पण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या विरोधातील अल् कादिर ट्रस्ट प्रकरणाला काहीच भक्कम आधार नाही. त्यामुळे हे प्रकरण कोसळणार आहे’, असे इम्रान खान यांचा पक्ष ‘तेहरीक-ए-इन्साफ’ पक्षाच्या विदेशी माध्यम विभागाने म्हटले आहे.

२. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांची हिंसक आंदोलने

वर्ष २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाची कामगिरी चांगली राहिली होती. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाचा हा निवाडा इम्रान खान आणि त्यांचा पक्ष यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात आहे. इम्रान खान यांच्या समर्थक उमेदवारांना या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरावे लागले होते. असे असतांनाही त्यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या; पण सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत त्यांना मिळवता आले नाही.

इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांची हिंसक आंदोलने

इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचार आणि सत्तेचा अपवापर करणे, एप्रिल २०२२ मध्ये त्यांना संसदेत विश्‍वासदर्शक ठरावाच्या माध्यमातून पदावरून हटवले गेल्यानंतर हिंसाचार भडकवणे इत्यादी डझनभर खटले चालू आहेत. ९ मे २०२३ या दिवशी त्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी सैन्याच्या परिसरात धुडगूस घालत आंदोलनासाठी समर्थकांना भडकवल्याचा आरोप वगळता बहुतेक प्रकरणांमध्ये इम्रान खान यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे किंवा त्यांची शिक्षा रहित करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांचे समर्थक गेल्या अनेक दिवसांपासून हिंसक आंदोलने करत आहेत.

३. इम्रान खान यांना पाकिस्तानी सैन्याच्या अप्रसन्नतेचा फटका

पाकिस्तानी सैन्य हे तेथील महत्त्वाची शक्ती आहे. इम्रान खान हे अनुमाने ५ वर्षे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांनी पदभार घेतला, तेव्हा ते पाकिस्तानी सैन्याचे आवडते होते. नंतर इम्रान खान हे त्यांची स्वत:ची धोरणे राबवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे हळूहळू इम्रान खान यांना बाजूला टाकण्यात आले. त्यानंतर काहीतरी कारणांनी त्यांच्यावर विविध खटले प्रविष्ट करण्यात आले. शेवटी विविध प्रकरणांमध्ये त्यांना १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यांच्या समवेतच त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनाही ७ वर्षांची शिक्षा झाली आहे.

पाकिस्तानात इम्रान खान यांना भ्रष्टाचाराविषयी शिक्षा होणे, हा अत्यंत मोठा विनोद म्हटला पाहिजे; कारण पाकिस्तानमध्ये पंतप्रधान राहिलेले नवाज शरीफ, बेनझिर भुट्टो किंवा भुट्टो कुटुंबीय हे अत्यंत भ्रष्टाचारी समजले जात होते. वास्तविक नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी देशाबाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे अनेक वर्षे त्यांनी इंग्लंडमध्ये अज्ञातवासात घालवली होती. याखेरीज बेनझिर भुट्टोचे पती झरदारी यांनाही ‘मिस्टर टेन परसेंट’ म्हटले जात होते, म्हणजे कुठलेही कंत्राट पारित करतांना झरदारी यांना १० टक्के द्यावे लागत होते. या सर्वांच्या तुलनेत इम्रान खान हे सर्वाधिक प्रामाणिक होते. खरे कारण इम्रान खान हे पाकिस्तानी सैन्य आणि सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आवडणारे नव्हते. इम्रान खान दीड-दोन वर्षांपासून कारागृहात असले, तरी त्यांची पाकिस्तानातील लोकप्रियता अतिशय अधिक आहे. त्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळाली आहे.

४. इम्रान खान यांच्या राजकीय कारकीर्दीचा शेवट

इम्रान खान यांचे वय अनुमाने ७२ वर्षे आहे. १४ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर ते पाकिस्तानच्या राजकारणात सक्रीय भाग घेण्याच्या स्थितीत नसतील. थोडक्यात इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राजकीय जीवनातून बहुतांश काढण्यात आले आहे. हा पाकिस्तानी लोकशाहीचा एक मोठा पराभव आहे. आजही ते सर्वांत प्रामाणिक समजले जातात आणि ते त्यांच्या देशात सर्वाधिक लोकप्रिय आहेत; परंतु सैन्याने दडपशाहीचा वापर करून राजकीय शक्ती म्हणून त्यांना कायमचे संपवले.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (१७.१.२०२५)