प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्न : आतुरस्य च किं मित्रम् ?
अर्थ : रोग्याचा मित्र कोण ?
उत्तर : भिषक् ।
अर्थ: वैद्य, चिकित्सक आणि औषधोपचार करणारा तज्ञ.
सगळ्याच व्याधी उपचारावाचून बर्या होणार्या नसतात. तेव्हा रोग्याला, विशेषतः गंभीर व्याधीने पीडित व्यक्तीला योग्य उपचार करणार्या तज्ञाचे मार्गदर्शन आणि साहाय्याची आवश्यकता असते. रोग व्यक्तीला होत असला आणि त्यामुळे उत्पन्न होणारी पुष्कळशी लक्षणे त्या त्या व्यक्तीलाच जाणवत असली, तरी रोगाची कारणे अन् त्यामुळे उत्पन्न झालेल्या शरिरातील विकृतीचे स्वरूप तज्ञ वैद्यच जाणू शकतो. अर्थात् रोगाचे योग्य निदान त्या तज्ञालाच करता येते; म्हणून रोगनाशक उपचार करणे किंवा सुचवणे तज्ञच करू शकतो.
आयुर्वेदात सांगितलेले वैद्याचे गुण
चांगला परिणाम होऊन पूर्ववत् आरोग्य प्राप्त होण्यासाठी ४ गोष्टी योग्य त्या गुणांनी युक्त असाव्या लागतात. आयुर्वेदाने ‘चतुष्पादसंपत्’ या नावाने त्या ४ गुणांचा उल्लेख केला आहे. त्यात स्वतः रोगी, परिचारक, औषध आणि वैद्य या ४ गोष्टींचा समावेश आहे. त्यात वैद्याचे गुण सांगतांना आयुर्वेदाने म्हटले आहे, ‘दक्षस्तीर्थात्तशास्त्रार्थो दृष्टकर्मा शुचिर्भिषक् ।’ (अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान, अध्याय १, श्लोक २८) म्हणजे ‘चिकित्सक हा सतर्क, बुद्धीमान, विद्वान आणि शुद्ध असावा.’ चिकित्साशास्त्राचा अभ्यास पूर्ण करून, तो त्यात उत्तीर्ण झालेला असावा. त्याचे ज्ञान अद्ययावत् आणि सतेज असावे.
व्यवसाय करण्यापूर्वी त्याने संबंधित विषयाच्या अधिकारी व्यक्तींच्या हाताखाली पुष्कळ अनुभव घेतलेला असावा. त्याचे वर्तन पवित्र असावे, म्हणजे तो निर्व्यसनी, पैशाचा लोभ नसलेला, सभ्य आणि सज्जन असावा. वरील उल्लेख केलेल्या ४ गोष्टींपैकी ३ गोष्टीतील उणिवा लक्षात घेऊन वैद्य उपचार करू शकतो. चिकित्सकच जर आवश्यक त्या गुणांनी युक्त नसला, तर मात्र रोग्याचे अवघड आहे, हेच खरे. म्हणून वर सांगितलेल्या गुणांनी संपन्न असलेल्या चिकित्सकाला रोग्याचा मित्र म्हणणे योग्यच आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)