आता ‘कोवॅक्सिन’ लसीचेही दुष्परिणाम समोर !

श्वसनाचा संसर्ग आणि अन्य आजार होत असल्याचे संशोधनातून निष्पन्न !

नवी देहली – कोव्हिशील्ड या कोरोनावरील लसीचे दुष्परिणाम आढळल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. आता ‘भारत बायोटेक’ आस्थापनाची संपूर्ण भारतीय बनावटीची कोरोना लस ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम असल्याचे लक्षात आले आहे. ‘स्प्रिंगरलिंक’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार बनारस हिंदु विद्यापिठात केलेल्या अभ्यासात सहभागी झालेल्या अनुमाने एक तृतीयांश लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम आढळून आले. कोरोनाच्या लसींमध्ये भारतात प्रामुख्याने कोव्हिशील्ड लस देण्यात आली. साधारण ५-१० टक्के भारतियांना कोवॅक्सिन लस देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोवॅक्सिनचेच दोन डोस घेतले होते.

विशेष म्हणजे कोव्हिशील्ड लसीचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर २ मे या दिवशी कोवॅक्सिनचे आस्थापन ‘भारत बायोटेक’ने कोवॅक्सिनच्या सुरक्षिततेचे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने मूल्यांकन केल्याचे सांगून ही अत्यंत सुरक्षित लस असल्याचा दावा केला होता.

अहवालातील महत्त्वपूर्ण निष्कर्ष !

१. ज्यांना कोणत्याही ऍलर्जीचा त्रास आहे, त्यांना कोवॅक्सिनचा धोका असतो.

२. हा अभ्यास करणार्‍या शंखा शुभ्रा चक्रवर्ती म्हणाल्या की, आम्ही एका वर्षापासून लसीकरण झालेल्या लोकांची माहिती गोळा केली. हा अभ्यास १ सहस्र २४ लोकांवर करण्यात आला.

३. वरच्या श्वसनमार्गाचे संक्रमण ३०४ किशोरवयीन आणि १२४ प्रौढ यांच्यामध्ये दिसून आले. त्यामुळे लोकांमध्ये सर्दी आणि खोकला यांसारख्या समस्या दिसून आल्या.

४. किशोरवयीन मुलांमध्ये त्वचा संबंधित रोग (१०.५ टक्के), मज्जासंस्थेशी संबंधित विकार (४.७ टक्के) आणि सामान्य विकार (१०.२ टक्के) आढळून आले. प्रौढांमध्ये मात्र सामान्य विकार (८.९ टक्के), स्नायू आणि हाडांशी संबंधित विकार (५.८ टक्के) अन् मज्जासंस्थेशी संबंधित विकार (५.५ टक्के) दिसून आले.

५. यासमवेत ज्या किशोरवयीन मुली आणि प्रौढ महिला यांना पूर्वी कोणतीही ऍलर्जी होती अन् ज्यांना लसीकरणानंतर ‘टायफॉइड’ झाला होता, त्यांना अधिक धोका होता.