भगवा रंग हीच हिंदूंची खरी ओळख !

‘दूरदर्शन’च्या बोधचिन्हाचा रंग भगवा केल्याचे प्रकरण

तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ‘प्रसार भारती’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी केलेले ‘दूरदर्शनच्या लोकांचे होत असलेले भगवेकरण पाहून वाईट वाटले’, हे वक्तव्य ‘भगवा रंग हीच हिंदूंची खरी ओळख’, असे शीर्षक या लेखाला देण्यास कारणीभूत ठरले आहे. जवाहर सरकार यांना भगव्या रंगाचे वैशिष्ट्य अन् महात्म्य ठाऊक नाही, असे दिसते. भगव्या रंगाविषयी त्यांच्या मनात असलेला अपसमज आणि त्यातून निर्माण झालेले त्या रंगाचे भय त्यांच्या मुखावाटे प्रगट झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना भगव्या रंगाचे श्रेष्ठत्व, वैशिष्ट्य आणि महात्म्य त्याच्या व्याप्तीसह सांगणे नितांत आवश्यक आहे. म्हणूनच या लेखाचे शीर्षक ही त्याला अनुसरूनच देण्यात आले आहे. हे लेखाच्या प्रारंभी स्पष्ट करणे सयुक्तिक वाटते.

प्रतिकात्मक छायाचित्र

१. हिंदूंनी सहिष्णुता आणि निधमीपणा मान्य करणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व स्वतःच नष्ट करणे होय !

आपल्या देशात हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, यहुदी, पारशी असे विविध धर्मांचे, पंथांचे लोक रहातात. ‘हा देश या सर्वांचा आहे’, हे आपण मान्य केले, तरी ‘ही भूमी मूलतः हिंदूंची आहे’, हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. अन्य धर्मियांना हिंदुस्थानच्या भूमीने आपल्यात सामावून घेतले आहे. त्यांना त्यांच्या धर्मानुसार वागण्याचे पूण स्वातंत्र्य दिले आहे. ‘त्यांच्याविषयी आपुलकी, सहिष्णुता बाळगू नका, अकारण त्यांच्याशी वैर करा’, अशी शिकवण हिंदु धर्म आणि संस्कृती देत नाही. ‘ते सारे या देशात गुण्यागोविंदाने नांदावेत; म्हणून हिंदूंनी त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टींना सोडचिठ्ठी द्यावी’, असे जर कुणाला वाटत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. ‘ही सोडचिठ्ठी दिली, तर हिंदु सहिष्णू आणि निधर्मी आहेत’, अशी कुणी सहिष्णुता अन् निधर्मीपणा यांची व्याख्या करत असेल, तर ती हिंदूंना मान्य नाही. इतर धर्मियांनी त्यांचा धर्म आणि संस्कृती यांप्रमाणे आचरण करावे; पण तसे हिंदूंना करता येणार नाही. असा पायबंद जर कुणी घालत असेल, तर तो घालून घेणे, म्हणजे ‘हिंदूंनी स्वतःचे अस्तित्व स्वतःच्या हाताने नष्ट करण्यासारखे आहे.’ म्हणून हे हिंदु समाज मान्य करणार नाही.

‘अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावतात’, या नावाखाली ‘हिंदूंनी त्यांचे धार्मिक सण आणि सांस्कृतिक उत्सव साजरे करायचे नाहीत’, असा अपप्रचार जाणीवपूर्वक स्वातंत्र्यपूर्व काळापासून सातत्याने चालू आहे. ‘हिंदूंनी त्यांचा धर्म आणि संस्कृती यांविषयी श्रद्धा अन् अभिमान बाळगणे, हे जघन्य कृत्य आहे’, असे वातावरण देशात निर्माण करून हिंदूंची जात, संस्कृती, धर्म नष्ट करण्यासाठी चाललेले हे षड्यंत्र आहे कि काय ? असा संशय दिवसेंदिवस बळावत आहे. ‘कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये’, असे भारतीय राज्यघटनेचे ब्रीद आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हिंदु समाजाने हातात शस्त्र धारण करून स्वतःच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार आजच्या क्षणापर्यंत कधीही केला नाही. हिंदु धर्माएवढा सहिष्णू आणि उदारमतवादी अन्य कोणताही धर्म जगाच्या पाठीवर आढळणार नाही, ही वस्तूस्थितीही दृष्टी आड करता येत नाही.

२. भगव्या रंगाचे महात्म्य

श्री. दुर्गेश परुळकर

भगवा रंग हे साधकत्वाचे, त्यागाचे लक्षण आहे. हिंदु धर्म आणि संस्कृती त्याला महत्त्व देते. हिंदु तत्त्वज्ञान मानवी जीवनाचे आध्यात्मिक आणि व्यावहारिक असे २ भाग असल्याचे सांगते. आध्यात्मिक जीवनाचा भाग म्हणून माणसाने त्यागी वृत्ती धारण करावी, तसेच व्यावहारिक जीवन जगत असतांनाही माणसाला भोगाचा अतिरेक करता येणार नाही, अशी एक मर्यादा हिंदु धर्म, संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांनी घालून दिली आहे. ‘आध्यात्मिक जीवन जगून माणसाने मुक्ती प्राप्त करावी’, यासाठी त्यागी वृत्ती धारण करणे अनिवार्य आहे; म्हणून हिंदु धर्माने आध्यात्मिक जीवन जगणार्‍यांसाठी भगवी वस्त्रे परिधान करण्याचा दंडक घालून दिला.

हिंदूंसाठी भगवा रंग हा त्याग, पावित्र्य आणि शुद्धता यांचे चिन्ह आहे. ‘व्यावहारिक जीवन जगत असतांना, म्हणजेच समाजात, राष्ट्रात वावरत असतांनाही त्यागी वृत्ती धारण करावी’, असा दंडक हिंदु धर्म आणि संस्कृती यांनी घालून दिला आहे. पारमार्थिक जीवन मुक्ततेचा मार्ग शिकवते, तर भौतिक जीवन अभ्युदयाकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करते. अशा प्रकारे मुक्ती आणि भुक्ती यांचा, म्हणजेच स्वातंत्र्याचे अन् संपन्नतेचे प्रतीक भगवा रंग आहे. ‘त्यागयुक्त होऊन भोग भोगावा’, हे सांगणारा भगवा रंग आहे.

३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलेले भगव्या ध्वजाचे महात्म्य

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि परकीय इस्लामी आक्रमकांना पाणी पाजून हिंदूंचे स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले. या हिंदूपदपादशाहीचा ध्वज भगवाच होता. तो राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामींनी दिलेला ध्वज आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची व्याख्या समर्थ रामदासस्वामींनी केली, ‘सामर्थ्य आहे चळवळेंचे। जो जो करील तयाचें। परंतु येथें भगवंताचें। अधिष्ठान पाहिजे।।’ आणि ‘मुख्य हरिकथा निरूपण। दुसरें तें राजकरण। तिसरें तें सावधपण। सर्वविषईं।।’ याचा अर्थ हा भगवा रंग जसा त्याग आणि संयम यांचे प्रतीक आहे, तसेच शौर्य आणि पराक्रम यांचेही प्रतीक आहे. चळवळीतील सामर्थ भगव्या रंगातूनच प्रकट होते; कारण राष्ट्राच्या स्वातंत्र्यार्थ, रक्षणार्थ लढणारे हे वीर सामर्थ्याची, शौर्याची पराकाष्ठा करून स्वतःचा प्राण राष्ट्रार्थ अर्पण करतात. भगव्या रंगाची ही व्याप्ती आणि महात्म्य हिंदूंच्या रोमारोमांत भिनलेले आहे.

हिंदुस्थानातील विविध प्रांत, पंथ, जाती यांना हा भगवा रंग अत्यंत पूज्य आहे. ज्या ज्या वेळी हिंदु समाजावर आणि राष्ट्रावर संकट आले, त्या वेळी संपूर्ण हिंदु समाज याच भगव्या ध्वजाखाली एकवटला. असंख्य हिंदूंना प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा हा भगवा ध्वज आहे. अखिल मनुष्य जातीसाठी प्रत्यक्ष बुद्धीवादाने भौतिकशास्त्राच्या परिभाषेतही पटवून देता येणारी ॐकारयुक्त कुंडलिनी आणि कृपाण याचे भव्य चिन्ह भगव्या ध्वजावर अंकित करण्यात आले आहे. हा भगवा रंग कोट्यवधी हिंदु विरांच्या प्रतापाचा साक्षीदार आहे. साधू-सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा विनाश यांसाठी तत्पर असलेला मानवी समाज भूतलावर मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी धडपड करत असतो. त्याला प्रेरणा देणारा हा भगवा रंग आहे; म्हणून या भगव्या रंगाला कमी लेखता येणार नाही.’

देशातील विविध राज्ये आणि भारत सरकार यांचे संस्कृत भाषेनुसार ध्येय

आता सर्वांत महत्त्वाचे हे की, कितीही लोकांनी हिंदु धर्माला विरोध केला आणि हिंदूंना ‘संकुचित वृत्तीचे असहिष्णू’ म्हणून हिणवले, तरीसुद्धा एक गोष्ट त्यांना सांगणे नितांत आवश्यक आहे. ती म्हणजे स्वातंत्र्य प्राप्त केल्यापासून आजपर्यंत राज्यघटनेच्या मर्यादेत राहूनच देशातील विविध राज्ये आणि भारत सरकार यांच्या ध्येय वाक्याकडे आपण दृष्टी टाकल्यावर ‘भारत देश हिंदूंचा आहे’, हेच अधोरेखित होते. त्याचे दाखले पुढीलप्रमाणे…

१. दूरदर्शनचे ध्येय वाक्य : ‘सत्यं शिवं सुन्दरम्।’, म्हणजे ‘जे सत्य आहे तेच कल्याणकारी आणि सुंदर आहे.’

२. भारत सरकारचे ध्येय वाक्य : ‘सत्यमेव जयते।’, म्हणजे ‘नेहमी सत्याचाच विजय होतो.’

३. महाराष्ट्र राज्याचे ध्येय वाक्य : ‘प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते।’, म्हणजे ‘जसा प्रतिपदेचा चंद्र कलेकलेने वाढत विश्ववंदनीय होतो, तशी ही महाराष्ट्र राज्याची मुद्रा विश्वाचे कल्याण करणारी होवो.’

४. जनरल इन्शुरन्स कंपनी : ‘आपत्काले रक्षिष्यामि।’, म्हणजे ‘संकटकाळी मी रक्षण करतो.’

५. भारतीय जीवनविमा निगम : ‘योगक्षेमं वहाम्यहम्।’, म्हणजे ‘मी चरितार्थ चालवतो.’

६. भारतीय नौसेना : ‘शं नो वरुण:।’, म्हणजे ‘वरुणदेवता आमचे कल्याण करो.’

७. भारतीय स्थलसेना : ‘सेवा परमो धर्मः।’, म्हजे ‘सेवा करणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे.’

८. भारतीय वायुसेना : ‘नभ: स्पृशं दीप्तम्।’, म्हणजे ‘आकाशाला स्पर्श करणारे तेजस्वी.’

९. सर्वोच्च न्यायालय : ‘यतो धर्मस्ततो जयः।’, म्हणजे ‘जिथे धर्म (न्याय) आहे तिथे विजय निश्चित आहे.’

१०. गोवा राज्य : ‘सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात्।’, म्हणजे ‘सर्वांचे कल्याण होवो, कुणी दुःखी असू नये.’

११. जम्मू काश्मीर सेना : ‘प्रशस्त रणवीरता।’, म्हणजे ‘युद्धात वीरता प्रशंसनीय आहे.’

१२. काश्मीर लाईट इन्फंट्री : ‘बलिदानं वीरलक्षणम्।’, म्हणजे ‘बलिदान हेच वीराचे लक्षण आहे.’

१३. सेना अनुसंधान : ‘बलस्य मूलं विज्ञानम्।’, म्हणजे ‘शक्तीचा स्रोत विज्ञान आहे.’

१४. भारतीय प्रशासनिक सेवा : ‘योगः कर्मसु कौशलम्।’ म्हणजे ‘कौशल्यपूर्ण कर्म करणे हा योग आहे.’

१५. भारतीय तटरक्षक : ‘वयं रक्षामः।’, (आम्ही रक्षण करतो.)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

४. देशावर हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे वर्चस्व, म्हणजेच भगव्या रंगाचे वर्चस्व रहाणारच !

या लेखात दिलेली संस्कृत भाषेतील ही वचने हिंदूंच्या विविध धर्मग्रंथांतील आहेत. याचाच अर्थ राज्यघटनेत ‘हिंदुस्थान हे राष्ट्र ‘निधर्मी’ असले, तरी या देशावर हिंदु संस्कृती आणि धर्म यांचे वर्चस्व आहे’, म्हणजेच भगव्या रंगाचे वर्चस्व आहे. या देशात विविध धर्मांच्या अनुयायांना सुखाने जीवन जगता येईल; पण देशाच्या स्वामित्वाचा अधिकार त्यांना कधीही प्राप्त होणार नाही. तो अधिकार प्राप्त करण्यासाठी त्यांना या देशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी आपली नाळ जोडावी लागेल. हाच संदेश या बोधवाक्यामधून किंवा या ध्येय वाक्यातून प्रतीत होतो. याच कारणास्तव या लेखाचे शीर्षक ‘भगवा रंग हीच हिंदूंची खरी ओळख’ असे देण्यात आले आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२२.४.२०२४)