गोवा : केरी येथे पार पडला श्री विजयादुर्गा देवस्थानचा सुवर्ण शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव !

केरी येथील श्री विजयादुर्गा देवस्थान

फोंडा : केरी येथील श्री विजयादुर्गा देवस्थानचा सुवर्ण शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव २१ एप्रिल या दिवशी भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. ‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् शृंगेरी’चे जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांच्या अमृत हस्ते श्री. संजय किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत हा सुवर्णकलश विधीवत प्रतिष्ठापित करण्यात आला.

सुवर्ण शिखर कलशाचे पूजन करतांना जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी

गोमंतकातील मंदिरांना अनेक वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. अशा मंदिरांची गौरवसंपन्नता अधिकाधिक वाढीस लागली पाहिजे, असे प्रतिपादन जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांनी केले. शिखर कलश प्रतिष्ठापना समारंभानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार दिगंबर कामत, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर, माजी आमदार दीपक ढवळीकर, तसेच अन्य मान्यवर यांनी भेट घेऊन स्वामीजींचा आशीर्वाद घेतला.

२२ एप्रिलपासून श्री विजयादुर्गा देवस्थान केरी येथे सहस्रचंडी अनुष्ठानास प्रारंभ झाला असून हे अनुष्ठान २६ एप्रिलपर्यंत चालेल. २६ एप्रिल या दिवशी श्री गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाधीश श्रीमद् विद्याधीश श्रीपाद वडेर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहस्रचंडी अनुष्ठान समाप्ती, प्रार्थना, अन्नसंतर्पण आणि आशीर्वाद, असे कार्यक्रम होतील.

‘लोककल्याणास्तव आयोजित केलेल्या या अनुष्ठानाला उपस्थित राहून सर्व भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा’, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष डॉ. संतोष देसाई यांनी केले आहे.

कांही चित्रमय क्षणचित्रे . . . 

शिखर सुवर्णकलश घेऊन मंदिरास प्रदक्षिणा घालतांना
स्वामीजींच्या हस्ते संस्थान माहिती शिलालेखाचे अनावरण

स्वामीजींसमवेत मुख्यमंत्री डॉ. सावंत, राजेंद्र देसाई, संजीव देसाई आणि इतर मान्यवर