विकासकाला ठोठावला ८ लाख रुपयांचा दंड !
पुणे – मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली विनापरवाना चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी कारवाई केली. प्रशासकीय अनुमतीविना ८०० झाडे तोडणार्या विकासावर कारवाई करून वनविभागाने ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच आरोपीकडून या दंडाची रक्कम वसूल केली. मुळशी तालुक्यातील नेरे भागात ही घटना घडली. या भागात कार्यरत ‘वसुंधरा सामाजिक उन्नती वृक्ष लागवड’ आणि ‘वृक्ष संवर्धन सहकारी संस्थे’ने मुळशी वनविभागाच्या कार्यालयात वृक्षतोडीची तक्रार प्रविष्ट केली होती. (वन विभागाला दिसत नव्हते का ? – संपादक) संस्थेच्या मालकीच्या क्षेत्रात वर्ष २०१६ मध्ये लावलेले ४०० वृक्ष आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या वृक्षांची अवैध वृक्षतोड झाल्याची तक्रार केली होती. त्या अन्वये पहाणी केली असता ८०० झाडांची तोड झाल्याचे लक्षात आले. सरकारी नियमान्वये अपेक्षित असलेला प्रति झाड १ सहस्र रुपयांप्रमाणे ८०० झाडांसाठी ८ लाख रुपये दंड वसूल केल्याची माहिती पौड वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी दिली. वृक्षतोड करणे अनिवार्य असल्यास वनविभागाकडे अर्ज देणे बंधनकारक आहे. नेरेतील कारवाईमुळे या भागातील विकासकांना वृक्षतोड करणे महागात पडू शकते, याची जाणीव झाल्याचे पौड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले.