१५ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाची’ या शब्दाचा अर्थ, ‘सव्यसाची’ गुरुकुलाचे कार्य कसे चालू झाले ? आणि तिथे काय काय शिकवले जाते ?’, तो भाग पाहिला. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/784236.html
६. ‘सव्यसाची’ गुरुकुलात दिले जाणारे शिक्षण !
६ अ. मर्दानी खेळ शिकवणे : ‘शिवकालीन मर्दानी खेळ (युद्धकला)’, ही ‘सव्यसाची गुरुकुला’ची प्रमुख शिकवण आहे. यामध्ये लाठी-काठी, फरी -गदगा (टीप १), ढाल-तलवार, विटा–भाला (टीप २) झुंज, दांडपट्टा, घोडेस्वारी, धनुष्य-बाण यांसारख्या प्राचीन खेळांचा समावेश आहे. हे शिक्षण ५ वी आणि ६ वी इयत्तेतील मुलांना दिले जाते. त्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक सिद्धता होते. शिवजयंतीसारख्या कार्यक्रमांमध्ये गुरुकुलाचे विद्यार्थी विविध मर्दानी खेळांचे सादरीकरण करतात.
(टीप १ – ‘फरी ’ म्हणजे चामड्याची ढाल आणि ‘गदगा’ म्हणजे चामड्याने मढवलेला लाकडी सोटा किंवा लाकडी तलवार. पूर्वी इंग्रजांनी ढाल-तलवार यांवर बंदी आणल्यावर फरी -गदगा हे सरावासाठी वापरत असत.)
(टीप २ – विटा हे एक भाल्यासारखेच एक शस्त्र आहे ; पण त्याच्या दांड्याला दोरी बांधलेली असते. या दोरीच्या साहाय्याने ते फेकल्यावर पुन्हा ओढून घेता येते.)
६ आ. भारतीय व्यायामपद्धत शिकवणे : येथे पूर्णतः भारतीय व्यायामपद्धतींचा अवलंब करून शरीर सदृढ केले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, जोर, बैठका, सूर्यनमस्कार, कवायती आणि त्राटक यांचा समावेश आहे. आधुनिक पद्धतीचे ‘जिम’ किंवा ‘फिटनेस क्लब’मध्ये शिकवले जाणारे कुठलेही पाश्चात्य व्यायामप्रकार (उदा. झुंबा, ऐरोबिक्स) येथे शिकवले जात नाहीत.
६ इ. योगासने शिकवणे आणि केली जाणे
६ ई. संगीत : प्रत्येकाच्या आवडीनुसार गायन, बासरी, तबला, पेटी या विषयाचे वर्ग असतात. आठवड्यातून एकदा या विषयाचे वर्ग घेतले जातात. विद्यार्थ्यांनी त्याचा गृहपाठ आठवडाभर करायचा असतो.
६ उ. शालेय शिक्षण देणे : गुरुकुलातील विद्यार्थी साधारण५ वी ते १२ वी या इयत्तेतील आहेत. शाळांच्या अनुमतीने त्यांच्या शालेय परीक्षाही गुरुकुलातच होतात. त्यामुळे त्यांना केवळ वार्षिक परीक्षेसाठी शाळेत जावे लागते. अशा प्रकारे त्यांचा बाहेरील जग आणि मुले यांच्याशी अल्प संपर्क येतो. त्यामुळे चांगले संस्कार होण्याच्या दृष्टीने हे विद्यार्थी अधिक काळ गुरुकुलाच्या पोषक वातावरणातच रहातात.
६ ऊ. प्राचीन भाषा शिकवणे : येथे प्राचीन भाषा, उदा. मोडी लिपीसारख्या दुर्मिळ भाषा शिकवल्या जातात. या भाषांमध्ये निपुणता आल्यास, जुने ग्रंथ वाचून त्याचा योग्य तो बोध लावणे शक्य होते. त्यामध्ये ‘विद्यावाचस्पती’ (डॉक्टरेट) पदवी मिळवणेही शक्य आणि सुलभ होते. गुरुकुलाचे ग्रंथालय असून त्यामध्ये राष्ट्र, धर्म, व्यायाम इत्यादी विषयांवर फार पूर्वीचे आणि दुर्मिळ ग्रंथ आहेत. अनेक ग्रंथांची स्थिती अत्यंत नाजूक असून नुसते पान उलटतांनाही ते फाटण्याची भीती वाटते. ग्रंथाच्या मूळ प्रकाशकांचा या ग्रंथांच्या संवर्धनाकडे विशेष कल नाही किंवा त्यांना ते शक्य नाही. त्यामुळे या ग्रंथांच्या चांगल्या प्रती काढून संवर्धन करण्याची प्रक्रियाही गुरुकुलात चालू आहे.
७. गुरुकुलातील आचार्य जवळच्या शासकीय शाळांमध्ये जाऊन स्वसंरक्षणाचे वर्ग घेत असणे
गुरुकुलातील आचार्य जवळच्या शासकीय शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षणाचे वर्ग घेतात. प्रत्येक आचार्य ५ ते ७ वर्ग घेतो. भुदरगड तालुक्यातील ४० शासकीय शाळांमध्ये हे वर्ग घेतले जातात.
८. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणारे शिक्षण !
८ अ. शिस्त लावणारे वैयक्तिक शिक्षण !
८ अ १. प्रत्येक कृती व्यवस्थित करायला कृती करून दाखवून शिकवणे : ‘एकदा मुलींच्या निवासी खोलीमध्ये काही मुलींनी अंथरुणाची घडी अव्यवस्थित घातली होती. तेव्हा तेथील मुलींचे दायित्व पहाणार्या ताईने त्यांना केवळ ‘हे व्यवस्थित आवरून ठेवा’, असे न सांगता ‘सर्वांच्या अंथरुणांची व्यवस्थित घडी घालून, ‘कुणी कुठे आणि कसे ठेवायचे ?’, हे त्यांना दाखवून शिकवले. यावरून ‘येथे कृती करून शिकवले जाते’, असे लक्षात आले.’
८ अ २. स्वावलंबन : ‘गुरुकुलात इयत्ता ५ वी ते १२ वीचे किंवा तरुण विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेतात. येथील सर्व लहान विद्यार्थीही स्वावलंबी आहेत, उदा. अंघोळीसाठी गरम पाणी हवे असल्यास स्वतः बंब पेटवणे, त्यासाठी लागणारे जळण स्वतः घेऊन येणे, स्वतःचे कपडे हाताने धुणे, इत्यादी.
८ अ ३. चांगल्या सवयी लावणे : काही विद्यार्थ्यांना सर्दी झाली होती; पण त्यांनी जवळ रुमाल ठेवला नव्हता. गुरुजींनी त्यांना लगेच रुमाल घेऊन यायला सांगितले आणि म्हणाले, ‘‘सामाजिक जीवन जगून स्वत:चे कल्याण करून घेण्याच्याही पलीकडचे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याचे ध्येय ठेवून आपण येथे रहातो. आपल्या कुठल्याही एका कृतीमुळे यामध्ये व्यत्यय येणार नाही’, याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी.’’
८ अ ४. वेळेचे पालन करायला शिकवणे : एकदा गुरुजी करत असलेले ग्रंथवाचन ऐकण्यासाठी काही विद्यार्थी ५ – १० मिनिटे उशिरा आले. यासाठी शिक्षा म्हणून त्यांना वाचन होईपर्यंत पूर्णवेळ उभे रहायला सांगितले.
८ अ ५. विद्यार्थ्यांच्या चुका त्वरित लक्षात आणून देणे : भिन्न-भिन्न प्रकृतींचे इतके (७५ – ८०) विद्यार्थी एकत्र रहात असल्यामुळे काही वेळा त्यांच्यात मतभेद होतात; पण त्याविषयी ते मोकळेपणाने मत मांडतात. त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण होऊन सर्वांनाच शिकता येते. तेथील विद्यार्थ्यांकडून चुका झाल्यावर त्या विद्यार्थ्यांचे दायित्व असणारे लगेच त्या-त्या वेळीच त्यांना त्यांच्या चुका सांगतात. ‘विद्यार्थीही ते सर्व शांतपणे ऐकून घेतात आणि चुका सांगणार्याशीही नंतर सहजतेने वागतात’, असे लक्षात आले.
८ आ. अभ्यासाचे दिले जाणारे आगळेवेगळे शिक्षण !
८ आ १. क्रांतीकारकांविषयीचा एक ग्रंथ निवडून तो अभ्यासून ‘त्यातून काय शिकता आले ?’, हे स्वतःच्या शब्दांत लिहिणे : गुरुकुलात बर्याच क्रांतीकारकांविषयीचे दुर्मिळ ग्रंथ आणि लिखाण उपलब्ध आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने एक क्रांतीकारक निवडून त्याच्या संबंधित ग्रंथ वाचून ‘त्यातून काय शिकायला मिळाले ?’, हे स्वतःच्या शब्दांत सविस्तर लहान ग्रंथ-पुस्तिका स्वरूपात लिहायचे. यामुळे मुलांमध्ये लहापणापासून ‘ग्रंथ वाचून विषय आत्मसात् करणे, क्रांतीकारकांचा अभ्यास करणे आणि ग्रंथ लिखाण करणे’, याची सवय लागण्यास साहाय्य होत आहे.
८ आ २. श्री. लखन जाधवगुरुजी करत असलेले ग्रंथवाचन ऐकून त्याचा सारांश स्वतःच्या शब्दांत सांगणे : विद्यार्थ्यांचे आवरून (स्नान, कपडे धुणे इत्यादी) झाल्यावर लखनगुरुजी मुलांसमोर प्रतिदिन एखाद्या ग्रंथातील (उदा. वाल्मीकि रामायण) अध्यायाचे वाचन करतात. ते वाचन करत असलेला विषय मराठीत असला, तरीही त्याची भाषाशैली उच्च असते. सर्व विद्यार्थीही अतिशय जिज्ञासू वृत्तीने संपूर्ण सर्ग (अध्याय) एकाग्रतेने ऐकतात. गुरुजींनी एक सर्ग वाचल्यावर सर्वप्रथम विद्यार्थी कठीण शब्दांचा अर्थ विचारतात. अर्थ समजल्यावर विद्यार्थ्यांना त्या सर्गाचा एकूण सारांश लक्षात येतो. त्यानंतर गुरुजी त्यांना जे समजले, ते त्यांच्याच शब्दांत सांगायला सांगतात. एकदा ऐकूनही तेथील काही विद्यार्थी त्यांना समजलेली कथा न चुकता सांगण्याचा प्रयत्न करतात. ते ऐकून आम्हाला त्यांचे कौतुक वाटले.
८ आ ३. शिकलेला विषय दैनंदिन जीवनात आचरणात आणायला शिकवणे : प्रवचन केवळ पारायणाप्रमाणे अर्थ आणि भावार्थ समजण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्या विषयाशी संबंधित सध्या समाजात असलेले अपसमज किंवा टीका यांचे खंडणही करायला शिकवले जाते. प्रवचनानंतर ‘वाचलेल्या कथेतून किंवा शिकलेल्या शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा ?’, ‘शिकलेल्या विषयाचा जीवनात कसा उपयोग करू शकतो ?’, हेही शिकवले जाते. उदा. भूमितीमधील संदर्भाचा बांधकाम करतांना उपयोग करणे, इत्यादी.
‘शिकत असलेला विषय समजणे, आचरणात आणणे, इतरांना समजावणे आणि विरोधकांचे खंडण करणे’, अशा ४ टप्प्यांत विद्यार्थ्यांची सिद्धता करण्याचा गुरुजींचा प्रयत्न असतो.
८ इ. भावजागृतीचे प्रयत्न करून घेणे : गुरुजी जेव्हा एखादे राष्ट्रगीत किंवा भावगीत गातात, तेव्हा ते भावपूर्ण गातात. ते ऐकतांना आपला स्वतःचाही भाव जागृत होतो. एकदा ‘वाल्मीकि रामायण’ या ग्रंथांचे वाचन करतांना शेवटी त्यांनी मातासीतेवर आधारित एक गीत लावून त्या गाण्यातील शब्द मुलांना भावपूर्ण ऐकून अनुभवायला सांगितले. अशा प्रकारे ते भावजागृतीचे प्रयत्नही करून घेतात.
(क्रमश:)
– भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचारतज्ञा सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे, फोंडा, गोवा. (१.३.२०२४)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/784838.html
संपादकीय भूमिका‘सव्यसाची गुरुकुलम्’प्रमाणेच हिंदु राष्ट्रात व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणारी गुरुकुल शिक्षणपद्धत असेल ! |