हिंदु नववर्षानिमित्त चिंचवड (पुणे) येथे भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न !

पारंपरिक पोशाख घालून ढोल-ताशांच्या गजरात ५०० हून अधिक नागरिकांचा सहभाग !

शोभायात्रेत सहभागी सनातन संस्थेचे साधक

चिंचवड (जिल्हा पुणे), १२ एप्रिल (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही गुढीपाडवा या दिवशी म्हणजेच ९ एप्रिलला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन ‘संस्कृती संवर्धन विकास महासंघा’च्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रसेविका समिती, पर्यावरण संरक्षण समिती, जीवन विद्या मिशन, ब्रह्माकुमारी, विविध सोसायटी सदस्य, पुनरुत्थान गुरुकुल विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळे, गणेश मंडळे, शिववंदना गट, श्रीदत्त मंदिर, श्री धनेश्वर मंदिर ट्रस्ट, ज्ञानेश्वर मित्र मंडळ आदी संस्था सहभागी झाल्या होत्या. या शोभायात्रेत सनातन संस्थेचे साधक हातात फलक घेवून सहभागी झाले होते. तसेच पारंपरिक पोशाख घालून ढोल ताशांच्या गजरात ५०० हून अधिक नागरिकांनी या स्वागतयात्रेत सहभाग नोंदवला. चिंचवड येथील श्री दत्त मंदिर, श्रीधरनगर येथून सायंकाळी ६ वाजता शोभयात्रेला दीपप्रज्वलन आणि आरती करून आरंभ झाला अन् श्री धनेश्वर मंदिर, चिंचवड येथे महाआरती आणि प्रसादाने शोभयात्रेची सांगता झाली.

या वेळी सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रांतील विविध मान्यवर उपस्थित होते. ठिकठिकाणी पाणी, सरबत व्यवस्था करण्यात आली होती. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. विविध ठिकाणी पुष्पवृष्टी, बालचमूंची विविध वेशभूषा, हलगी पथक, पारंपरिक वाद्ये आदींमुळे नवीन वर्षाच्या या भव्य शोभायात्रेत सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.