हिवरे गावामध्ये (पुणे) या वर्षी झेंड्याच्या ऐवजी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली !

  • हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम

  • पुणे जिल्ह्यात नववर्षानिमित्त सामूहिक गुढीपूजन उत्साहात पार पडले !

पुणे – हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. नववर्षाचा हा प्रारंभदिन पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. काही जणांनी गुढीच्या संदर्भात अपप्रचार केल्यामुळे हिवरे गावामध्ये पूर्वी गुढीच्या ऐवजी झेंडे उभारले जायचे; पण हिंदु जनजागृती समितीच्या हिवरे गाव शाखेच्या वतीने ‘गुढीपाडवा’ या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. या प्रवचनामुळे गुढीचे महत्त्व समजून या वेळी गावात सर्वांनी घरासमोर गुढी उभारलीच; पण शाखेतील धर्मप्रेमींनी एकत्र येऊन भैरवनाथ मंदिरासमोर सामूहिक गुढी उभारून रामराज्याची प्रतिज्ञाही घेतली.

अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. सर्व महिला आणि पुरुष धर्मप्रेमींनी वाघळवाडी गावात पहिल्यांदाच मंदिरासमोर गुढी उभारली होती. गावातील परंपरा आहे की, या दिवशी मंदिरा समोर गावातील पुरुष एकत्र येऊन गावातील यात्रा आणि इतर गोष्टी ठरवतात. या वेळी महिला येत नाहीत; मात्र गुढी उभारण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वाघळवाडी शाखेतील महिला आणि पुरुष धर्मप्रेमींनी एकत्र येऊन रामराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि घोषणा दिल्या.

२. हडपसर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, तुकाई माता मंदिर, गणेश मंदिर, संत गोरोबाकाका मंदिर आदी देवस्थानाच्या विश्वस्तांनी मंदिर विश्वस्त बैठकीत सांगितल्याप्रमाणे उत्स्फूर्तपणे आपापल्या मंदिरामध्ये सामूहिक गुढीपूजन केले.