लाच घेणार्‍या पीएच्.डी. मार्गदर्शकावर पुणे विद्यापीठ कारवाई करणार !

शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारी घटना !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – पीएच्.डी. (विद्यावाचस्पती) पदवीसाठी सिद्ध केलेल्या प्रबंधास मान्यता देणे, त्यातील सुधारणा करून पुन्हा सादर करणे आणि त्याला संमती देणे यांसाठी २० सहस्र रुपयांची लाच मागितली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. शकुंतला माने यांना ही लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. ही कारवाई सांगवी येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुखाच्या कार्यालयामध्ये घडली होती. या घटनेवर शिक्षणक्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर, विद्यापिठाकडून घटनेचा अभ्यास करण्यात येत असून मार्गदर्शकांवर कठोर कारवाई होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

ही कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक असल्याची प्रतिक्रिया अनेक प्राध्यापकांनी व्यक्त केली. विद्यापिठाने त्वरित मार्गदर्शकांवर कारवाई करावी आणि पुन्हा असे घडू नये म्हणून कडक धोरण राबवावे, असेही शिक्षणतज्ञांनी म्हटले आहे. संबंधित प्राध्यापकांची मार्गदर्शक म्हणून मान्यता काढून घेऊन पीएच्.डी.च्या विद्यार्थ्यांना दुसरा मार्गदर्शक देण्यात येणार आहे, असेही वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. प्रत्यक्ष कारवाईचे स्वरूप हे विद्यापिठाच्या चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

संपादकीय भूमिका :

असे लाचखोर प्राध्यापक विद्यार्थ्यांना काय घडवणार ? त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचीही चौकशी केली पाहिजे !