Pope Francis : रोम (इटली) येथील कारागृहात पोप फ्रान्सिस यांनी ‘गुड फ्रायडे’निमित्त १२ महिला बंदीवानांचे पाय धुतले !

(‘गुड फ्रायडे’च्या दिवशी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर लटकवण्यात आले होते.)

रोम (इटली) – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ‘गुड फ्रायडे’निमित्त रोम रेबिबिया कारागृहातील १२ महिला बंदीवानांचे पाय धुतले आणि त्यांच्या पायांचे चुंबन घेतले. पोप यांनी व्हीलचेअरवर बसून ही कृती केली. या वेळी या महिला बंदीवान उंच मंचावर बाकड्यावर बसल्या होत्या. जेव्हा पोप यांनी पाय धुतले, तेव्हा या बंदीवादांच्या डोळ्यांत अश्रू आले. पोप यांनी हळूवारपणे बंदीवानांच्या पायावर पाणी ओतले आणि लहान टॉवेलने ते कोरडे केले. त्यांनी महिलांच्या दोन्ही पायांचे चुंबन घेऊन विधी पूर्ण केला.

सर्व धर्मगुरूंनी ढोंगीपणापासून दूर राहिले पाहिजे ! – पोप फ्रान्सिस

पोप फ्रान्सिस यांनी या वेळी केलेल्या मार्गदर्शनात म्हटले की, सर्व धर्मगुरूंनी ढोंगीपणापासून दूर रहायला हवे. पाद्री सामान्य लोकांना जे काही उपदेश करतात, त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक जीवनातही त्याचे पालन केले पाहिजे. (जगात पाद्य्रांची ओळख ‘वासनांध व्यक्ती’ अशी होत असल्याचे म्हटले जात आहे. पाद्य्रांनी महिला आणि मुले यांचे लैंगिक शोषण केल्यावरून पोप यांना क्षमाही मागावी लागली आहे. याचाही विचार पाद्य्रांनी करणे आवश्यक आहे ! – संपादक)