साधकांना संतांच्या सत्संगात काही बोलायचे नसले, तरी सत्संगामुळे होणारे लाभ मिळवण्यासाठी त्यांनी सत्संगात बसावे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! ‘त्यांचा सत्संग लाभणे’, हे साधकांचे अहोभाग्यच आहे. संतांच्या सत्संगात असतांना त्यांच्यातील ईश्वरी चैतन्याचा साधकांना लाभ होत असतो. त्यांच्या वाणीत चैतन्य असल्याने त्यांनी सांगितलेली साधनेविषयीची सूत्रे साधकांच्या अंतर्मनावर बिंबतात आणि साधकांना साधना करण्यासाठी प्रेरणा मिळते. ‘सत्संगातील इतर साधकांनी संतांना साधनेविषयी विचारलेले प्रश्न आणि त्यांची संतांनी दिलेली उत्तरे, तसेच इतर साधक करत असलेले साधनेचे प्रयत्न’, यांतून साधकांना शिकायला मिळते. संतांच्या सत्संगात साधकांवरील वाईट शक्तीचे आवरण दूर होऊन त्यांना चैतन्य मिळून आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतो. त्यामुळे साधकांना संतांच्या सत्संगात काही बोलायचे नसले, तरी सत्संगामुळे होणारे वरील लाभ मिळवण्यासाठी त्यांनी सत्संगात बसावे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२९.२.२०२४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.