मृत्यूदंड देण्याची शिक्षा पुढे ढकलली
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील आयडाहो येथे दोषीला विषारी इंजेक्शनने मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. कारागृह प्रशासनाच्या वैद्यकीय पथकाला तासभर प्रयत्न करूनही आरोपीची नस सापडली नाही. त्यांनी ८ वेळा नस शोधण्याचा प्रयत्न केला; पण ते अपयशी ठरले. त्यामुळे ही मृत्यूदंडाची शिक्षा पुढे ढकलण्यात आली.
‘ए.एफ्.पी’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ७३ वर्षीय थॉमस क्रीच याला ‘लीथल डेथ इंजेक्शन टेबल’ला (स्ट्रेचरवर) बांधण्यात आले होते. त्यानंतर वैद्यकीय पथकाने प्रयत्न करूनही त्यांना नस सापडली नाही. थॉमस क्रीच याला वर्ष १९८१ मध्ये ५ जणांच्या हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. तेव्हापासून ४३ वर्षे तो कारागृहात आहे.
विषारी इंजेक्शनद्वारे मृत्यूदंड देण्यास मान्यता
गॅस, इलेक्ट्रिक शॉक किंवा फाशी यांसारख्या मृत्यूदंडाच्या पद्धतींपेक्षा विषाचे इंजेक्शन देऊन मृत्यूदंड देणे अधिक मानवतावादी मानले जाते. यामागील तर्क असा आहे की, या इंजेक्शनमध्ये वापरल्या जाणार्या एका औषधामुळे गुन्हेगार बेशुद्ध पडतो. त्यामुळे मरणार्या व्यक्तीला वेदना होत नाहीत. तथापि अनेक डॉक्टरांनी विषारी इंजेक्शनला नैतिकतेचे उल्लंघन मानून विरोध केला होता; परंतु असे असतांनाही त्याच्या वापरास मान्यता देण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाभारतात दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याचे प्रमाण अल्प आहे आणि त्याही पुढे जाऊन ही शिक्षा कार्यान्वित होण्याचे प्रमाणही अल्प आहे. विदेशांत मृत्यूदंड देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची भारतात चर्चा होत असतांना भारतात दोषींना देण्यात येणारी मृत्यूदंडाची शिक्षा कशी कार्यान्वित होईल ?, याचीही चर्चा होणे आवश्यक ! |