‘हिंदुपदपादशाहीची स्थापना करणार्या गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजी भोसले आणि वीरमाता जिजाबाई यांचे पुत्र होते. शहाजी भोसले विजापूरच्या नवाबाच्या दरबारातील एक सरदार म्हणून चाकरी करत होते. ही गोष्ट जिजाबाईंच्या मनाला भावत नव्हती. त्यांना स्वतःचे एक स्वतंत्र ‘हिंदु राज्य’ हवे होते. ज्या राज्यामध्ये लोकांना हिंदु धर्म संस्काराचे योग्य प्रकारे पालन करता येईल; कारण अन्य धर्मीय नवाबाच्या राज्याची चाकरी करतांना असे घडणे शक्य नव्हते. यासाठी जिजाबाईंनी महाराष्ट्राची अधिष्ठात्री भवानीदेवीची उपासना केली. ज्यामुळे त्यांना शिवाजीसारखा सुपुत्र प्राप्त झाला.
राजमाता जिजाऊ यांनी केलेल्या संस्कारामुळेच छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे
माता जिजाबाई बाल शिवाजीला लहानपणापासूनच रामायण आणि महाभारत यांतील कथा अन् वीर महापुरुषांची चरित्रे सांगत. त्या छत्रपती शिवरायांना हिंदु धर्मावर आलेल्या संकटाची जाणीव करून देत आणि त्यावरील उपाययोजनांचेही शिक्षण देत. आईकडून मिळालेल्या या शिक्षणामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये ते सुसंस्कार विकसित झाले. पुढे लहानपणीच छत्रपती शिवरायांनी गायीला पकडून नेणार्या कसायाचा हात कापून जणू मोगल साम्राज्याला ललकारले. पुढे मोठे झाल्यानंतर याच छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगल सम्राट औरंगजेबाला सळो कि पळो करून सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहचा अफझलखान आणि औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान यांसारख्या मात्तबर सरदारांना स्वतःच्या तलवारीने पाणी पाजले. माता जिजाबाईंच्या इच्छेनुसार त्यांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
छत्रपती शिवरायांकडून परस्त्रीला मातेसमान आदर
शिवाजीराजे माता जिजाबाई यांचा अत्यंत आदर करत होते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये त्यांना स्वतःच्या मातेचेच रूप दिसायचे. त्यामुळेच एका लढाईत पकडलेल्या ‘गौहरबानू’ नावाच्या मुसलमान स्त्रीला त्यांनी ‘माता’ असे संबोधले आणि तिचा आदर-सत्कार करून तिला तिच्या घरीे परत पाठवले. असे केवळ हिंदु संस्कार असल्यावरच घडू शकते.’
– सौ. आशा सिंह
(साभार : मासिक ‘कल्याण’, नोव्हेंबर २०२२)