बेळगाव – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २८ जानेवारीपूर्वी नवीन नियमाप्रमाणे व्यापारी आस्थापनांवरील फलकावर ६० टक्के जागेत कन्नड लिहायला हवे, अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने या कन्नडसक्तीला विरोध करून जिल्हाधिकार्यांना या संदर्भात निवेदन दिले. कन्नडसक्ती करून सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा आधार घेऊन कन्नड संघटनांचे कार्यकर्ते मराठी भाषेतील फलक हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मराठी-कन्नड भाषिकांमधील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, असे त्या निवेदनात नमूद केले आहे.
या प्रसंगी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशी घोषणाबाजीही करण्यात आली.