EaseMyTrip : ‘ईझ माय ट्रिप’ आस्थापनाकडून मालदीवची सर्व विमान आरक्षणे रहित !

  • मालदीवने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत यांचा अवमान केल्याचे प्रकरण

  • राष्ट्राच्या एकात्मतेसाठी निर्णय घेतल्याचे आस्थापनाचे सहसंस्थापक निशांत पिट्टी यांचे सुतोवाच !

  • अनेक भारतियांकडूनही त्यांचा मालदीव दौरा रहित !

निशांत पिट्टी

नवी देहली – मालदीवच्या ३ मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर, तसेच भारतियांवर केलेल्या वर्णद्वेषी टीकेवरून तेथील सरकारने त्यांना निलंबित केले. मालदीवच्या मंत्र्यांच्या या भारतद्वेषी कृत्यांचा निषेध करण्यासाठी भारतियांनी मालदीववर बहिष्कार घालणारा ‘एक्स’वरून केवळ ‘ट्रेंड’च (एखाद्या विशिष्ट विषयावर घडवून आणलेली चर्चा) केला नाही, तर मालदीवला फिरायला जाण्याच्या योजना, विमानाची तिकिटे, हॉटेल आरक्षण आदीही रहित करण्यास आरंभ केला. अशातच पर्यटन आस्थापनांपैकी ‘ईझ माय ट्रिप’ या एका प्रमुख आस्थापनानेही मालदीवविरोधी कारवाई केली आहे. आस्थापनाने त्यांची मालदीवला जाणारी सर्व विमान आरक्षणे रहित केली आहेत.

‘ईज माय ट्रिप’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांनी या निर्णयासंदर्भात ‘एक्स’वरून पोस्ट केले आहे. ते म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या एकात्मतेसाठी ‘ईझ माय ट्रिप’ने मालदीवची सर्व विमानांची आरक्षणे रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादकीय भूमिका

  • स्वत:चे व्यावसायिक हित न जोपासता देशाचा प्रथम विचार करणार्‍या, म्हणजेच ‘राष्ट्रहित सर्वोपरि ।’ हे प्रत्यक्ष कृतीत आणणार्‍या ‘ईझ माय ट्रिप’चे अभिनंदन ! अशी राष्ट्रनिष्ठ आस्थापनेच भारताची वास्तविक शक्ती होत !