ShriRam Janmabhumi : श्रीरामजन्मभूमी आंदोलनात गोमंतकियांचा सहभाग ही अभिमानाची गोष्ट ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी, ६ जानेवारी (वार्ता.) : श्रीरामजन्मभूमी आंदोलनात गोमंतकियांचा सहभाग असणे, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
सावंत पुढे म्हणाले, ‘‘श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी कारसेवक म्हणून गोव्यातील अनेक जण अयोध्येला गेले होते. राष्ट्र उभारणीच्या या कार्यामध्ये गोव्यातील लोकांचा सहभाग, ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक भारतियासाठी श्रीराममंदिर हे ‘राष्ट्रमंदिर’ आहे.’’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘गोव्यातील अनेक मंदिरे जी पोर्तुगिजांनी नष्ट केली, त्या मंदिरांचे स्मारक बांधण्यात येईल का ?’, या प्रश्‍नाला उत्तर देताना सावंत म्हणाले, ‘‘यासंबंधी स्थापन केलेल्या समितीचा याविषयीचा अहवाल सिद्ध झाला आहे. हा अहवाल सरकारकडून स्वीकारण्यात येईल.’’ पर्वरी येथे होणार्‍या उड्डाण पुलाविषयी सावंत म्हणाले, ‘‘पर्वरी येथे उड्डाण पूल होईपर्यंत या मार्गावरून बांदा येथून येणारी अवजड वाहने बांदा-दोडामार्ग-अस्नोडामार्गे वळवण्यात येतील. पर्वरी आणि साळगाव या ठिकाणच्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याचे काम सरकारने चालू केले आहे अन् उड्डाण पूल बांधण्याच्या वेळी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाविषयीचा सविस्तर आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. याच्या जोडीला बेती-पणजी फेरीसेवा चालू करण्यात येईल. या दोन वर्षांच्या कालावधीत लोकांची गैरसोय होईल; परंतु लोकांनी सहकार्य करावे. सरकारकडून भूमी कह्यात घेण्याची प्रक्रिया झाल्यानंतर चोडण येथील पुलाची पायाभरणी करण्यात येईल.’’