हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्याकडून समितीचे रत्नागिरीमधील कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी दिलेल्या योगदानाबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अन् लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते २५.६.२०२३ या दिवशी नोएडा (उत्तरप्रदेश) येथे त्यांना ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संदर्भात त्यांचा सार्वजनिक सत्कार, व्याख्याने आणि पत्रकार परिषद यांचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि आयनी (तालुका खेड) येथे करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना श्री. रमेश शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली अन् त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.(भाग १)

१. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना शिकायला मिळालेली आणि जाणवलेली सूत्रे

१ अ. श्री. संजय जोशी, रत्नागिरी

श्री. संजय जोशी

१ अ १. सकल हिंदु समाज, रत्नागिरी यांच्या वतीने श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार अन् व्याख्यान यांचे आयोजन करण्यात येणे : श्री. रमेश शिंदे यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्कार मिळाल्याचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाले होते. हे वृत्त वाचून रत्नागिरी येथील शासकीय सेवेतील एका उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी मला संपर्क करून ‘रत्नागिरीवासियांच्या वतीने श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार करूया’, असे सुचवले. त्या अधिकार्‍यांनी श्री पतित पावन मंदिर येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या बैठकीत श्री. रमेश शिंदे यांच्या सत्काराचे सूत्र मांडले. त्याला उपस्थितांनी अनुमोदन दिले आणि सकल हिंदु समाज, रत्नागिरी यांच्या वतीने श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार अन् त्यानंतर त्यांचे व्याख्यान, असा कार्यक्रम ठरला.

१ अ २. ‘समितीच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांचा (श्री. शिंदे यांचा) सत्कार हा प.पू. गुरुदेवांचाच सन्मान आहे’, असे वाटणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) यांच्या प्रेरणेनेच रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. ‘त्याच रत्नागिरी जिल्ह्यात समितीच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांचा सत्कार होत आहे’, हा प.पू. गुरुदेवांच्या प्रेरणारूपी संकल्पाविषयी हिंदूंमध्ये प्रगट झालेला कृतज्ञताभाव आहे’, असा विचार मनात येऊन ‘हा सन्मान प.पू. गुरुदेवांचाच आहे’, असे मला जाणवले.

१ अ ३. श्री. रमेश शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. रमेश शिंदे

१ अ ३ अ. तत्परता आणि इतरांचा विचार करणे : कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्या संदर्भातील ‘सोशल मिडिया’ची (सामाजिक माध्यमांसाठीची) ‘पोस्ट’ आणि ‘होर्डिंग’वरील लिखाण (मजकूर) (कागदावर रचना करून) श्री. रमेश शिंदे यांना पडताळायला पाठवली. त्यावर रमेशदादांनी त्याविषयीच्या प्रश्नांची तात्काळ उत्तरे देऊन सुधारणाही सुचवल्या. कार्यक्रमाच्या संदर्भात वेळोवेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचीही उत्तरे त्यांनी तात्काळ दिली.

१ अ ३ आ. सहज आणि सोप्या भाषेत विषय मांडण्याचे कौशल्य : रत्नागिरी येथील कार्यक्रमात ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने रमेशदादांचा सत्कार झाल्यानंतर त्यांचे ‘हलाल जिहाद’ या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यान घेतांना ‘विषय उपस्थितांना समजेल, अशा सहज आणि सोप्या भाषेत अन् ‘पीपीटी’चा (‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’चा) प्रभावीपणे वापर करून कसा मांडावा ?’, हे रमेशदादांकडून शिकता आले. त्यांचे व्याख्यान पूर्ण होईपर्यंत एकही श्रोता जागेवरून उठला नाही. त्यांच्या व्याख्यानानंतर हिंदुत्वनिष्ठ पुष्कळ प्रभावित झाले.

१ अ ३ इ. श्रोत्यांचा अभ्यास करून त्यांना विचार करायला प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने विषय मांडणे : रत्नागिरी आणि चिपळूण येथे झालेल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी ‘हलाल जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ हे विषय ‘पीपीटी’च्या साहाय्याने उदाहरणांसहित मांडले. ग्रामीण भागात आयनी (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथे विषय मांडतांना त्यांनी आरंभी रामायणातील काही प्रसंग सांगितले आणि हिंदु संस्कृतीचे महत्त्व विशद केले. त्यानंतर त्यांनी हिंदु धर्मियांवरील आघातांचा विषय मांडला. तो ऐकून एका महिलेने ‘त्या परिसरात हिंदूंचे धर्मांतर कसे होत आहे ?’, याविषयीची उदाहरणे स्वतःहून सांगितली. तेव्हा ‘व्याख्यान घेतांना समोरील व्यक्तींचा अभ्यास करून त्यांना समजेल अशा भाषेत सूत्रे कशी घ्यायला हवीत ? श्रोत्यांना विचार करायला प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने विषय कसा मांडावा ?’, हे मला शिकता आले.

१ अ ३ ई. श्रोत्यांना कृती करण्यास प्रवृत्त करणे : रत्नागिरी येथे एका विश्रामगृहाच्या (हॉटेलच्या) ‘कॉन्फरन्स हॉल’मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रमेशदादांनी ‘हलाल जिहाद’ हा विषय ‘प्रोजेक्टर’च्या साहाय्याने ‘पीपीटी’ दाखवून मांडल्यावर पत्रकार पुष्कळ प्रभावित झाले. ‘एवढा गंभीर विषय असेल’, हे आम्हाला ठाऊकच नव्हते. ‘यासंदर्भात तुमचे कुठे आंदोलन असेल, तर आम्ही तेथे येऊ’, असे पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे सांगितले.

१ अ ३ उ. ‘एकत्रित येऊन कार्य करण्यासाठी संघटनांना जोडून कसे ठेवायचे ?’, हे शिकवणारे श्री. रमेश शिंदे ! 

१. रत्नागिरी येथील कार्यक्रमात सत्कार झाल्यानंतर केलेल्या भाषणात रमेशदादांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून भारताच्या सीमाप्रदेशातील भागात करत असलेले कार्य कसे कौतुकास्पद आहे !’, हे सांगितले. व्याख्यानाला उपस्थित असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी व्याख्यानानंतर दादांची भेट घेऊन या उल्लेखाविषयी यांचे आभार मानले.

२. रत्नागिरी येथील सत्कार आणि व्याख्यान झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी चिपळूण येथे सकाळी लवकर कार्यक्रम होता. रत्नागिरी येथे व्याख्यानाला आलेल्या ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या धारकर्‍यांची ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेला रमेशदादांनी यावे’, अशी इच्छा होती. त्यांनी दादांना तशी विनंती केली. दादांनी ती मान्य केली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर ते नित्य पूजेला वेळेत उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते नित्य पूजा पार पडली. तेथे धारकर्‍यांनी दादांचा सत्कारही केला. एकीकडे कार्यक्रमाला चिपळूणला निघायचे होते आणि धारकर्‍यांनी विनंती केल्याप्रमाणे नित्य पूजेलाही जायचे होते. असे असूनही दादांनी सर्वांना शांतपणे वेळ दिला. तेव्हा ‘एकत्रित येऊन कार्य करण्यासाठी संघटनांना जोडून ठेवणे महत्त्वाचे असते. ते कसे करायला हवे ?’, हे या दोन प्रसंगांतून मला शिकता आले.

१ अ ३ ऊ. समाजातील बेकायदेशीर गोष्टी टिपण्याची सतर्कता असणे आणि त्यावर उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करणे : रत्नागिरी येथे कार्यक्रमाला जातांना वाटेत पेट्रोल पंपावर चालक कार्यकर्ता गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी थांबला होता. त्या वेळी तेथे एकाच दुचाकीवरून तीन मुसलमान युवक पेट्रोल भरायला आले. रमेशदादांनी ही घटना छायाचित्रकात (कॅमेर्‍यात) टिपून घेतली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अन् पालकमंत्री यांना उद्देशून या घटनेचे ट्वीटही केले. तेव्हा ‘समाजात वावरतांना आपल्याला दिसणार्‍या बेकायदेशीर गोष्टी टिपण्याची सतर्कता आपल्यात निर्माण व्हायला हवी आणि त्यावर आपल्या क्षमतेप्रमाणे तत्परतेने उपाय शोधण्याचा प्रयत्नही करता यायला हवा’, हे माझ्या लक्षात आले.

१ अ ३ ए. एकाच वेळी विविध सेवा करणे : चिपळूण येथील कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही आयनी (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील कार्यक्रमाला जायला चारचाकी वाहनाने निघालो. ‘चिपळूण येथील कार्यक्रमाची वार्ता बनवतांना कोणती आणि कशी सूत्रे घ्यावीत ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. ही अडचण मी दादांना सांगितली. तेव्हा त्यांच्या पुढील कार्यक्रमांच्या नियोजनाच्या सूत्रांवर चर्चा आणि अनुभवकथन चालू होते. तेव्हा दादांनी कार्यक्रमाचे वृत्त आणि आवश्यक सूत्रे योग्य मांडणीसह सिद्ध करून मला लगेच ‘व्हॉट्स ॲप’वर पाठवली.

१ अ ३ ऐ. स्थानिक स्थितीचा विचार करून प्रसिद्धीच्या संदर्भातील सेवा करणे : ‘सोशल मिडिया’साठी कार्यक्रमाचा संदेश तयार करतांना ‘तो थोडक्यात आणि स्थानिक ठिकाणची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन कसा तयार करावा ?’, हे मला दादांकडून शिकता आले. रत्नागिरी ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असल्याने दादांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख ‘सोशल मिडिया’ संदेशात केला.

‘कार्यक्रमाची प्रसिद्धीपत्रके महत्त्वाची सूत्रे थोडक्यात घेऊन बनवल्यास प्रकाशकांना ती छापणे सोयीचे होते आणि चांगली प्रसिद्धी मिळते’, हे दादांनी प्रसिद्धीपत्रकाचे संपादन करण्याच्या माध्यमातून मला शिकवले. यातून ‘एखादी सेवा त्याच्यातील बारकाव्यांसह स्थानिक स्थितीचा विचार करून कशी करावी ?’, हे मला दादांकडून शिकता आले.

१ अ ३ ओ. सहकार्यकर्त्यांची काळजी घेणे : आयनी गावातील व्याख्यानाला खेड (जिल्हा रत्नागिरी) येथून समितीच्या एक महिला कार्यकर्त्या दुचाकीने आल्या होत्या. व्याख्यान सायंकाळचे असल्याने व्याख्यान संपेपर्यंत अंधार होणार होता. त्यामुळे त्या कार्यकर्त्या थोडा वेळ व्याख्यानाला थांबून दुचाकीने घरी गेल्या. व्याख्यान संपल्यानंतर लगेच गटचर्चेला आरंभ होणार होता. त्या व्यस्ततेतही दादांनी मला विचारले, ‘‘त्या कार्यकर्त्या केव्हा गेल्या ? ‘त्या सुखरूप घरी पोचल्या का ?’, हे त्यांच्या घरी संपर्क करून विचारून घ्या.’’

१ अ ३ औ. शुद्ध हिंदीतून व्याख्यान देता यावे; म्हणून हिंदी भाषा सुधारण्यासाठी रात्रंदिवस तळमळीने प्रयत्न करणे : श्री. रमेशदादा यांनी ते पहिल्यांदा उत्तर भारतात प्रसारासाठी गेले असतांनाचा त्यांचा अनुभव सांगितला. त्या काळात प्रांतवाद उफाळून आला होता. उत्तर भारतात दादांचे व्याख्यान होते. व्याख्यान चालू झाल्यावर दादांच्या हिंदी शब्दोच्चारांवरून ‘दादा मूळचे महाराष्ट्रातील आहेत’, हे उपस्थितांच्या लक्षात आले. त्यांनी दादांना सांगितले, ‘‘तुम्ही हिंदूंना संघटित व्हायला सांगत आहात. ते आधी महाराष्ट्रात जाऊन सांगा आणि नंतर आम्हाला सांगायला या.’’ त्यानंतर दादांनी स्वतःची हिंदी भाषा सुधारण्यासाठी ‘प्रतिदिन हिंदी वर्तमानपत्रे आणि ‘सोशल मिडिया’ यांवरील वार्ता वाचणे, हिंदी वृत्तवाहिन्या पहाणे, हिंदी भाषेतील पुस्तके वाचणे आणि अभ्यास करणे’, इत्यादी प्रयत्न रात्रंदिवस चालू केले. काही कालावधीनंतर त्यांचे हिंदीतून व्याख्यान होते. व्याख्यान संपल्यावर उपस्थितांनी दादांना विचारले, ‘‘तुम्ही उत्तर भारतातील कोणत्या भागातून आला आहात ?’’ दादांनी ते महाराष्ट्रातून आले असल्याचे सांगितल्यावर सर्वांना आश्चर्य वाटले.

‘राष्ट्र आणि धर्म यांची सेवा परिपूर्ण अन् परिणामकारक होण्यासाठी झोकून देऊन आणि लागेल ते कष्ट घेऊन तळमळीने प्रयत्न कसे करायचे ?’, हे दादांनी सांगितलेल्या अनुभवातून मला शिकता आले.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)

(सर्व सूत्रांचा दिनांक : २८.८.२०२३)