Anti-Conversion Act : बिलिव्हर्सचा पास्टर डॉम्निक याला गोव्यातून तडीपार करा, गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करा !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पास्टर डॉम्निक याच्यासमवेत त्याची पत्नी जोअन मास्कारेन्हास

पणजी, १ जानेवारी : भोळाबाबड्या हिंदूंचे धर्मांतर करून गोव्यात घराघरांमध्ये वितुष्ट निर्माण करणारा ‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याला गोव्यातून तडीपार करावे, तसेच गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी १ जानेवारी या दिवशी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी केदार नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘करणी सेने’चे सर्वश्री संतोष राजपूत, ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान-डिचोली’चे रोहन शिरगावकर, पर्वरी येथील श्री रामवडेश्‍वर देवस्थानचे आनंद मांद्रेकर, आशिश कोचरेकर, सुशांत भोसले, सुजय ताम्हणकर, तनय कांदोळकर, म्हापसा येथील शिवप्रेमी विनोद वारखंडकर, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर, ‘रणरागिणी’च्या सौ. राजश्री गडेकर, सौ. नेहा गोवेकर, सौ. बबिता सावंत आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी केदार नाईक यांना निवेदन देतांना सौ. राजश्री गडेकर, श्री. गोविंद चोडणकर, श्री. जयेश थळी आणि इतर हिंदुत्वनिष्ठ

निवदेनात म्हटले आहे की, ‘परशुरामभूमी म्हणून गणल्या गेलेल्या गोमंतकात सर्व धर्मांतील लोक धार्मिक सलोखा टिकवून गुण्यागोविंदाने रहातात’, अशी जगभरात गोमंतकाची प्रतिमा आहे; मात्र गेली काही वर्षे सातत्याने हिंदूंचे धर्मांतर करत असलेल्या ‘बिलिव्हर्स’मुळे गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडला आहे.

‘बिलिव्हर्स’चे गोव्यात सडये, शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स चर्च’ हे प्रमुख स्थान आहे. हे ठिकाण म्हणजे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा एक अड्डाच आहे. ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक’ यांना १ जानेवारी २०२४ या दिवशी पहाटे पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केली आहे. धर्मांतर आणि जादूटोणा प्रकरणी ही कारवाई झालेली आहे. पास्टर डॉम्निक याच्या विरोधात हा तिसरा गुन्हा नोंद झालेला आहे. पास्टर डॉम्निक यांच्या पत्नीच्या विरोधातही आता गुन्हा नोंदवलेला आहे. धर्मांतरविरोधी कायदा गोव्यात नसल्याने ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांना धर्मांतर प्रकरणी तक्रार झाल्यावर वारंवार अटक करावी लागत आहे. यासाठी देशातील इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही धर्मांतरविरोधी कायदा करावा. ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांनी आतापर्यंत बलपूर्वक केलेली धर्मांतरे आणि त्यातून उभी केलेली संपत्ती यांची कसून चौकशी करावी.

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने गोव्याच्या पोलीस महासंचालकांची घेतली भेट

पणजी : हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर गोव्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली. पोलीस महासंचालकांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या रास्त असल्याचे सांगून या दृष्टीने योग्य पावले उचलणार असल्याचे आश्‍वासन दिले.