पिंपरी(पुणे) – पिंपरीगाव येथील नवमहाराष्ट्र विद्यालय आणि महात्मा फुले महाविद्यालयासमोरील प्रेक्षकांसाठी बनवण्यात आलेले यशवंतराव चव्हाण स्टेडियम सध्या दारूडे आणि चरसी यांचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी स्टेडियममध्ये विजेची आणि सीसीटीव्ही छायाचित्रकाची सोय नसल्याने हे दारूडे अंधाराचा अपलाभ घेत आहेत. त्यामुळे या स्टेडियममध्ये विजेची आणि सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
या मैदानात २ मोठे, तर एक लहान स्टेडियम आहे. शाळा आणि महाविद्यालयाचा परिसर असल्याने दिवसभर हे स्टेडियम विद्यार्थ्यांनी गजबजलेले असते. त्याचसमवेत सकाळी-संध्याकाळी खेळणे, व्यायाम आणि चालणे यांसाठी परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, खेळाडू, नागरिक या मैदानात मोठ्या संख्येने येत असतात आणि विरंगुळा म्हणून स्टेडियममध्ये बसतात. रात्रीच्या वेळी मात्र स्टेडियममध्ये कोणतीही विजेची सोय नसल्याने या ठिकाणी अंधार पडतो. सीसीटीव्ही छायाचित्रक नसल्याने अंधाराचा गैरफायदा घेऊन आसपासच्या परिसरातील दारुडे आणि चरसी, स्टेडियममध्ये बसून दारू, गांजा पितात. या ठिकाणी बसून दारूच्या बाटल्या फोडतात. याच ठिकाणी लघवी अथवा शौचालयाला बसून स्टेडियमही घाण करतात. त्याचा नाहक त्रास विद्यार्थी आणि नागरिक यांना होतो. त्याचसमवेत या ठिकाणी रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी येणार्या महिला आणि मुली यांसाठी ही धोक्याची गोष्ट आहे.