मडगाव, २२ डिसेंबर (वार्ता.) – किटल-फातर्पा येथील श्री आळारे आजोबा देवस्थानात चोरट्यांनी मंदिरात शिरून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे २ दरवाजे फोडून मंदिरात प्रवेश केला आणि तेथील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना दानपेटी फोडता आली नाही; परंतु त्यांनी दानपेटीची हानी केल्याचे आढळून आले, अशी माहिती देवस्थान समितीने दिली. यापूर्वीही या देवस्थानात चोरी झाली होती.
२२ डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजता पुजारी मंदिरात आले असता त्यांना देवस्थानात चोरीचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याविषयी देवस्थान समितीला कळवले. देवस्थान समितीने कुंकळ्ळी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी येऊन पहाणी केली. यासंदर्भात देवस्थान समितीचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘या परिसरात अनेक परप्रांतीय लोक काम करत आहेत. यापूर्वीही या मंदिरात चोरी झाली आहे. पोलीस या ठिकाणी गस्त घालतात; परंतु कुंकळ्ळी पोलिसांकडे गस्त घालण्यासाठी वाहने उपलब्ध नसल्याने त्यांना मर्यादा येते.’’
‘या चोरीच्या प्रयत्नामध्ये गुंतलेल्यांना अटक करावी’, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
संपादकीय भूमिकागोव्यातील हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! |