शहापूर पोलीस ठाण्यावर व्यापार्यांचा मूक मोर्चा !
ठाणे – शहापुरातील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर सेल्समन असणार्या दिनेशकुमार चौधरी यांच्यावर गोळीबार झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ शहापूर शहरातील शेकडो व्यापार्यांनी बाजारपेठ बंद करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. पोलीस ठाण्यावर व्यापार्यांनी मूक मोर्चा काढला. ४८ घंट्यांत आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका : चेतावणी दिल्यावरच पोलीस काम करतात, हे पोलीस यंत्रणेसाठी लाजिरवाणे आहे !
अमली पदार्थ तस्कराला चित्रपटगृहातून अटक !
नागपूर – येथील एका चित्रपटगृहात ‘पुष्पा २’ चित्रपट दाखवण्यात येत होता. अमली पदार्थ तस्कर विशाल मेश्राम चित्रपट पहात होता. त्या वेळी पोलिसांनी त्याला अटक केली. तो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या विरोधात २७ गुन्हे नोंदवलेले आहेत. त्याने यापूर्वी पोलिसांवरही आक्रमण केले होते.
११ कोटींपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ बाळगणारा अटकेत !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून आलेल्या एका प्रवाशाकडून ११ कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. त्याला अटक करण्यात आली. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली. बँकॉकहून येणार्या एका प्रवाशाकडे ११.३२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. ट्रॉली बॅगेमध्ये हे पदार्थ ठेवण्यात आले होते.
संपादकीय भूमिका : अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
९ बालकामगारांची सुटका !
भिवंडी – नफेखोरीसाठी अल्पवयीन मुलांकडून मजुरी करून घेतल्याची घटना भिवंडीत उघड झाली. पोलिसांनी धाड घालून ९ अल्पवयीन मुलांची सुटका केली. येथील गोदामात १२ ते १७ वर्षे वयोगटातील ९ मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तू बांधण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्या मुलांची सुटका करण्यात आली.
कत्तलीसाठी नेणार्या ३८ गोवंशियांची मुक्तता !
राजुरा (चंद्रपूर) – तालुक्यातील लक्कडकोट मार्गावरून ३ वाहनांतून कत्तलीसाठी नेणार्या ३८ गोवंशियांची पोलिसांनी मुक्तता केली. २० डिसेंबरच्या पहाटे गस्तीवरील पोलिसांनी ३ वाहनांना थांबण्यास सांगितल्यावर वाहनचालकांनी वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी २४ लाख रुपयांची वाहने जप्त केली. (राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नसल्याने ते उघडपणे गोवंश हत्येसाठी नेण्यास धजावतात ! – संपादक)
संपादकीय भूमिका : कत्तलीसाठी उघडपणे होणारी गोवंशियांची वाहतूक कायद्याचे भय नसल्याचे दर्शवते !