ISRO XPoSat Mission : ‘इस्रो’कडून कृष्ण विवराच्या संशोधनासाठीचा उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित !

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (‘इस्रो’ने) १ जानेवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजता ‘एक्सपोसॅट’ नावाची अवकाश दुर्बिण उपग्रहाद्वारे अंतराळात प्रक्षेपित केली. पृथ्वीपासून अनुमाने ६५० किलोमीटर उंचीवर ही ४६९ किलोग्रॅम वजनाची दुर्बिण यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आली. या दुर्बिणीवर २ उपकरणे बनवण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून अवकाशातील क्ष किरणांच्या उगमांच्या स्रोतांचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे कृष्ण विवर (ब्लॅक होल), तसेच न्यूट्रॉन तारे यांचे सखोल निरीक्षणही केले जाणार आहे. यातून त्यांच्याविषयीची नवी माहिती मिळण्यास साहाय्य होणार आहे. यानिमित्ताने भारतासह जगभरातील अवकाश संशोधनाला मोठी माहिती मिळण्यास साहाय्य होणार आहे.

या मोहिमेचे आयुष्य अनुमाने ५ वर्षांचे असेल. ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे. त्यामुळे कृष्ण विवरांच्या रहस्यमय गोष्टींचा अभ्यास करण्यास साहाय्य होणार आहे.

‘इस्रो’व्यतिरिक्त अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने डिसेंबर २०२१ मध्ये ‘सुपरनोव्हा’ स्फोटाचे अवशेष, कृष्ण विवरांमधून उत्सर्जित होणार्‍या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता.