ISRO XPoSat Mission : कृष्ण विवरा’चे संशोधन करण्यासाठी ‘इस्रो’ आज प्रक्षेपित करणार उपग्रह !

  • ‘एक्स-रे पोलारिमीटर’ उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण होणार !

  • तिरुपती बालाजीचे घेतले आशीर्वाद !

तिरुपती (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ १ जानेवारी २०२४ या दिवशी प्रथमच ‘एक्स-रे पोलारिमीटर’ उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. हे उपग्रह ‘कृष्ण विवरा’शी (‘ब्लॅक होल’शी) संबंधित संशोधन करणार आहे. यासह अन्यही महत्त्वपूर्ण ब्रह्मांडीय सूत्रांचे संशोधन या माध्यमातून केले जाणार आहे. या मोहिमेचे नाव ‘पी.एस्.एल्.व्ही.- सी ५८’ किंवा ‘एक्सपोसॅट मिशन’ असे आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ‘इस्रो’चे वैज्ञानिक अमित कुमार पात्रा, विक्टर जोसेफ, यशोदा आणि श्रीनिवास यांनी तिरुमला-तिरुपती येथे येऊन तिरुपती बालाजीचे आशीर्वाद घेतले.  ‘एक्सपोसॅट’ १ जानेवारीला सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन अंतरिक्ष केंद्रा’तून प्रक्षेपित केले जाईल.

हा आहे मोहिमेचा उद्देश !

  • विविध आकाशीय स्रोतांकडून ज्या ‘एक्स-रे’ किरणांचे अंतराळात तीव्र प्रमाणात उत्सर्जन होते, अशा किरणांचे ध्रुवीकरण या मोहिमेच्या माध्यमातून मोजण्यात येणार आहे. असे करणारी ‘इस्रो’ची ही पहिलीच मोहीम आहे.
  • या मोहिमेतून ‘एक्स-रे’ किरणांची तीव्रता आणि कोन यांची अतिरिक्त माहिती मिळणार असल्याने ब्रह्मांडीय ग्रहांच्या किरणोत्सर्गामागील रहस्ये उलगडण्यास पुष्कळ साहाय्य होणार आहे.
  • यासाठी दोन ‘पेलोड’ (यंत्र) या उपग्रहावरून पाठवण्यात येणार आहे. यात ‘पोलिक्स’ (एक्स-रेमधील ‘पोलारिमीटर’ उपकरण) आणि ‘एक्सस्पेक्ट’ (एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंग) यांचा समावेश आहे. ‘पोलिक्स’ची निर्मिती ‘रमण रिसर्च इन्स्टिट्यूट’ने, तर ‘एक्सस्पेक्ट’ची निर्मिती ‘यू.आर्. राव उपग्रह केंद्रा’ने केली आहे.