भगवान शिवाच्या विश्वात नेणारा महाकाल कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) !

‘काही मासांपूर्वी मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉरला भेट देण्याची संधी मिळाली. ‘अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका…’ या श्लोकातील अवंतिका नगरी, म्हणजेच उज्जैन आहे, ती मोक्षदायिनी नगरी आहे. येथेच महाकाल हे ज्योतिर्लिंग आहे. ५१ शक्तीपिठांपैकी गढकालिकामाता मंदिर आणि महाकवी कालिदास यांची कुलदेवी हरिसिद्धीमातेचे मंदिरही येथेच आहे. भगवान श्रीकृष्णाचे शिक्षण झाले, तो सांदीपनिऋषींचा आश्रम उज्जैन येथेच आहे. उज्जैन शहरात कर्क आणि भूमध्य रेखा एकमेकांना छेदतात. याला ‘पृथ्वीची नाभी’ म्हटले जाते. प्राचीन हिंदु खगोलीय मान्यतेनुसार उज्जैन एकेकाळी भारताची केंद्रीय मध्य रेखा मानले जात होते. प्रत्येक १२ वर्षांनी येथे कुंभमेळाही भरतो, असे उज्जैन या क्षेत्राचे माहात्म्य आहे.

महाकाल सुसज्ज मार्गाच्या परिसरामधील कमळतलावात बसवण्यात आलेली शिवाची ध्यानस्थ मूर्ती

१. सुसज्ज मार्गाची व्याप्ती

श्री. यज्ञेश सावंत

महाकाल ज्योतिर्लिंगाच्या आजूबाजूचा परिसर मध्यप्रदेश शासनाने विकसित केला, तोच महाकाल कॉरिडॉर ! हा कॉरिडॉर काशीविश्वनाथ कॉरिडॉरपेक्षा ४ पटींनी मोठा आहे. यावरून तो किती भव्य आहे, याची थोडीफार कल्पना येऊ शकते. त्याचा एकूण व्यय ८५६ कोटी रुपये एवढा अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन वर्ष २०२२ मध्ये झाले असून दुसर्‍या टप्प्याचे काम वर्ष २०२४ मध्ये पूर्ण होईल. ९४६ मीटर लांबीचा कॉरिडॉर असून पूर्वीचा २.४६ हेक्टरचा परिसर ४७ हेक्टरहून अधिक मोठा करण्याचा याद्वारे प्रयत्न आहे.

महाकाल म्हणजे काळाचे स्वामी, म्हणजेच भगवान शिव आहेत. दक्षिण दिशेला पहाणारे हे एकमात्र ज्योतिर्लिंग आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी अन्य सर्वांचे मुख पूर्वेला आहे. अकाल मृत्यूपासून रक्षण होण्यासाठी या ज्योतिर्लिंगाची पूजा केली जाते.

२. शिवभक्ती जागृत करणारा ‘महाकाल लोक’

अन्य देवस्थानांच्या ठिकाणी असलेले कॉरिडॉर म्हणजे काही देवतांच्या मूर्ती, आकर्षक कलाकुसर, भारतीय वास्तूकला, शिल्पकला यांचे दर्शन घडवणार्‍या असतात. येथे वेगळे वैशिष्ट्य, म्हणजे भगवान शिवाविषयी पुष्कळ ज्ञान देणार्‍या प्रतिमा आणि मूर्ती पूर्ण कॉरिडॉरच्या परिसरात ठेवल्याने भक्ताच्या शिवाविषयीच्या ज्ञानात भर पडते किंवा काहींना शिवाविषयी पहिल्यांदा कधी न ऐकलेली अथवा वाचलेली माहिती मिळते. या संपूर्ण परिसराला ‘महाकाल लोक’ असे नाव दिले आहे. शिवविवाह, त्रिपुरासुराचा वध, शिव पुराण आणि शिव तांडव स्तोत्रातील कथा सांगणारी भिंतीवरील १०८ चित्रे आणि ९३ मूर्ती आपले लक्ष वेधून घेतात. महाकाल कॉरिडॉरचे प्रवेशद्वार भव्यदिव्यही आहे; कारण त्यावर देवतांची चित्रे, शिल्पे, कलाकृती आहेत. महाकालचे प्रवेशद्वार म्हणजे भव्य कमान असून त्यावर नंदीची मूर्ती एका विशाल रूपात असून शिखरावर नंदीच्या अन्य ४ प्रतिमा विराजमान आहेत. या द्वाराच्या समोरच शिवपुत्र गणेश आणि भव्य त्रिशूळ, तसेच रुद्राक्षाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर कमळकुंड आणि त्यामध्ये भगवान शिवाची ध्यानस्थ मूर्ती आहे.

३. पौराणिक कथा आणि देखावे

पौराणिक कथांचे देखावे आणि मूर्ती पहात आपण शिवलोकात आहोत किंवा शिवकाळात जात आहोत, असे वाटते. कमळकुंडाच्या पुढे सप्तर्षींचे मंडल आहे, म्हणजेच सप्तर्षींच्या मूर्ती गोलाकार बसलेल्या स्वरूपात दाखवल्या असून सर्वांत उंच ५४ फूट उंचीचा शिवस्तंभ येथे आहे. हा शिवस्तंभ, म्हणजे ५ मुखी शिवाची मूर्ती, त्याखाली नाट्यमुद्रा आणि ध्यानमुद्रेतील शिव, त्याखाली भगवान शिवाचे त्रिशूळ, डमरू, चंद्रकोर आणि नाग असून सर्वांत खाली श्लोक लिहिला आहे. पुराणांतील उल्लेखांनुसार सप्तऋषी हे भगवान शिवाचे पहिले शिष्य होते, ज्यांना महाकालाने दीक्षा दिली. त्यामुळे भगवान शिवाजवळ त्यांच्या मूर्ती त्यांच्या माहितीसह दिल्या आहेत.

महाकाल लोकात छोट्या छोट्या वाटिका सिद्ध केल्या असून त्यामध्ये भगवान शिवाच्या पराक्रमांचे, असुर निर्दालनाच्या कथा मांडल्या आहेत. उदा. भगवान शिव, ब्रह्मदेव आणि विष्णु यांनी एकत्रितपणे त्रिपुरासुराशी युद्ध केले होते. सृष्टी वाचवण्यासाठी ब्रह्मदेव शिवाचे सारथी, तर विष्णु शिवाच्या बाणांमध्ये सामावले होते. ४ वेद हे ४ अश्व झाले होते.

प्रत्येक ठिकाणी मूर्ती अथवा प्रतिमेच्या खाली ‘क्यू.आर्. कोड’ (‘क्विक रिस्पॉन्स कोड’ म्हणजे बारकोडप्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा) दिला असून तो ‘स्कॅन’ करून भ्रमणभाषमध्ये संबंधित कथा ऐकण्यासाठी आणि माहिती या स्वरूपात आपल्याला उपलब्ध होते. त्या व्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणी थोडक्यात माहिती दिलेली आहे.

महाकाल कॉरिडॉरच्या मध्यभागी कैलास पर्वत अष्टभुजांनी उचलू पहाणारा रावण, तर केवळ अंगठ्याने पर्वत दाबून रावणाचा अहंकार ठेचणारा भगवान शिव या मूर्ती लक्ष वेधून घेतात. महाकाल कॉरिडॉरच्या १०८ स्तंभांवर १०८ कलाकृती बनवल्या आहेत. या भगवान शिवाच्या ‘आनंद तांडव’च्या कलाकृती आहेत. राजस्थान आणि ओडिशा येथील कलाकारांनी त्या सिद्ध केल्या आहेत.

४. धार्मिक महत्त्व असलेला रुद्रसागर तलाव

महाकाल कॉरिडॉरच्या शेजारी असलेल्या रुद्रसागर तलावाचा काठही चांगल्या प्रकारे विकसित केला असून तो या ‘महाकाल लोका’चा भाग आहे. ‘रुद्रसागर म्हणजे पूर्वी उज्जैनमध्ये सप्त सागर होते. त्यातील अन्य ६ सागर आटले आणि केवळ रुद्रसागर तेवढा शेष आहे. या रुद्रसागराचे पाणी महाकाल मंदिरातील कोटी तीर्थ कुंडात जाऊन मिसळते आणि त्या कुंडातील जलाने भगवान शिवाला अभिषेक केला जातो’, असे रुद्रसागरचे धार्मिक महत्त्व आहे.

५. प्रशासनाकडून चांगली व्यवस्था

प्रशासनाने चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या स्वरूपात चप्पल व्यवस्था, भाविकांना ने-आण करण्यासाठी इलेक्ट्रिक चारचाकी गाड्या, प्रसाद देण्याची व्यवस्था पुष्कळ चांगली आहे. उत्तर भारतातील बहुतांश देवस्थानांमध्ये मंदिराच्या प्रशासनाकडूनच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद दिला जातो. त्यामुळे भाविकांच्या दृष्टीनेही सोयीचे जाते. या व्यतिरिक्त महाकाल मंदिराच्या प्रशासनाकडून दर्शनार्थींना विनामूल्य भोजन व्यवस्था दोन्ही वेळेसाठी उपलब्ध आहे. संपूर्ण महाकाल लोकाची रचना अत्यंत सुंदर आणि रात्रीच्या वेळी केलेल्या प्रकाशयोजनेमुळे अत्यंत नयनरम्य असे दृश्य येथे पहाण्यास मिळते. जणू दीपोत्सवाने महाकालचा परिसर उजळून निघाला आहे, असे वाटते.

महाकाल सुसज्ज मार्गातील एक भागातील भिंतीवर केलेले कोरीवकाम

६. भस्म आरती

महाकालाला भस्म अत्यंत प्रिय आहे. महाकाल येथे होणारी भस्मआरती पहाटे असते आणि ती पहाण्यास अथवा करण्यास मिळणे भाग्याचे समजले जाते. ही भस्म आरती करण्यास मिळण्यासाठी काही मासांचे नव्हे, तर वर्षांचे आगाऊ आरक्षण केलेले असते. मंदिराच्या गाभार्‍याच्या बाहेर अधिक संख्येत भाविक थांबू शकत नाहीत. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांची गैरसोय होऊ नये. त्याला ही भस्म आरती जणू तो स्वत: मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन पहात आहे, अनुभवत आहे, असे वाटण्यासाठी मंदिर प्रशासनाने डिजिटल माध्यमाची सुविधा केली आहे. येथे येणार्‍या भाविकाला काही मूल्य देऊन थेट ‘व्हि.आर्. (व्हर्च्युअल)’ भस्म आरतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशिष्ट प्रकारचे यंत्र डोळ्यांवर लावून भाविक ८ ते १० मिनिटांसाठी कोणत्याही वेळेत ही भस्म आरती पाहू शकतात.

७. अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न

महाकाल लोक परिसरामध्ये ज्या मूर्ती उभारल्या आहेत, त्या मूर्तींच्या चेहर्‍यावरील भाव अधिक सात्त्विक करू शकतो. या मूर्ती म्हणजे काही पुतळा नाही, त्या संबंधित देवतेचे भाव प्रक्षेपित करणार्‍या असाव्यात. जेणेकरून मूर्ती अथवा प्रतिमेच्या ठिकाणी मिळालेल्या माहितीसह देवतेच्या मूर्ती पाहूनही भाविकाचा भाव जागृत झाला पाहिजे. उज्जैन येथे काही मासांपूर्वी आलेल्या प्रचंड सोसाट्याच्या वार्‍यामुळे सप्तर्षींपैकी काही ऋषींच्या मूर्ती पडल्या आणि त्या दुखावल्या गेल्या. सोसाट्याचा वारा, अतीवृष्टी झाली, तर मूर्ती तग धरून राहिल्या पाहिजेत. भव्य-दिव्य मंदिरे आणि त्याचा परिसर करणे आवश्यक आहेच; मात्र मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न हवेत.

येणार्‍या भाविकांकडून महाकाल लोक परिसरात नामजप करून घेणे, त्यांना केवळ छायाचित्रे काढणे, सेल्फी (स्वतःची) छायाचित्रे घेणे यांत रममाण होण्याऐवजी शिवलोकातील वातावरण अनुभवण्याची जाणीव करून देणे, असे केल्यास भाविकही आणखी लाभ करून घेऊ शकतील.

८. उज्जैनचे सत्ताधीश महाकाल !

‘महाकाल स्वत:च उज्जैनचे मुख्य सत्ताधीश म्हणजे राजा आहेत’, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे मुख्यमंत्री अथवा कुणी मंत्री आल्यास ते उज्जैनमध्ये वस्ती करत नाहीत, म्हणजे रात्री येथे थांबत नाही. कुणी येथे थांबल्यास त्याचे पद जाते, अशी लोकांमध्ये भावना आहे.

अशा प्रकारे उज्जैनच्या नावाला साजेसा मंदिर आणि त्याचा परिसर विकसित करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. याला जनतेचे सहकार्य मिळणेही तेवढेच आवश्यक आहे. यातूनच येथील पावित्र्य टिकून राहील, महाकालाचे वैभव टिकून राहील आणि त्याची कीर्ती उत्तरोत्तर वाढत राहील !’

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.१२.२०२३)