आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत सादर केलेली ध्वनीचित्रफीत वर्ष २०१६ पूर्वीची असल्याचे स्पष्ट !
पुणे – भाजपचे नेते आणि आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत नाशिकमधील ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्तासमवेतचे एक छायाचित्र आणि ध्वनीचित्रफीत दाखवत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे सलीम कुत्ता आणि बडगुजर यांच्यात संबंध असल्याची चर्चा चालू झाली होती. दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड महंमद सलीम मीर शेख उपाख्य सलीम कुत्ता गेल्या ६ वर्षांपासून येरवडा कारागृहात आहे. ६ वर्षांत एकदाही त्याची जामिनावर किंवा ‘पॅरोल’वर मुक्तता झाली नाही, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे राणे यांनी सादर केलेली ध्वनीचित्रफीत वर्ष २०१६ पूर्वीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई बाँबस्फोट प्रकरणात सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येरवडा कारागृहात भरती करण्यापूर्वी सलीम याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्या वेळी तो १० दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता. त्यामुळे विधानसभेत सादर करण्यात आलेली ध्वनीचित्रफीत त्या वेळची असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.