आज ‘पांडव पंचमी’ आहे. त्या निमित्ताने…
Diwali Deepawali diwali 2023 deepawali 2023 Pandav Panchmi
बहीण-तीज
दिवाळीचे मुख्य दिवस भाऊबिजेला संपतात. त्यानंतर बहीण तीज, अक्कण तीज, आजी चतुर्थी, पांडव पंचमी आणि घबाड षष्ठी, असेही दिवस काही प्रमाणात साजरे केले जातात. कार्तिक शुक्ल तृतीया ‘बहीण तीज’ म्हणून साजरी केली जाते. भाऊबिजेच्या दुसर्या दिवशी भाऊ बहिणीला आपल्या घरी जेवायला बोलावून तिचा आदर सत्कार करतो. तिचा कष्टपरिहार आणि श्रमपरिहार करतो. या दिवसाला ‘बहीण-तीज’ असे म्हणतात.
अक्कण तीज
पूर्वी एकत्र कुटुंबात केशवपन केलेल्या विधवा असत. भाऊबिजेचा दुसरा दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवलेला असे. कर्नाटकात या दिवसाला ‘अक्कण तीज’ असे म्हणतात.
आजी चतुर्थी किंवा मातामह चतुर्थी
कार्तिक शुक्ल चतुर्थी ‘मातामह चतुर्थी’ किंवा ‘आजी चतुर्थी’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी मान असतो आजोबा-आजी यांचा ! आई-वडिलांएवढेच त्यांना महत्त्व असते. त्यांचा सुरकुतलेला हात नातवंडांच्या पाठीवर प्रेमाने फिरला की, नातवंडांना कमालीचे समाधान लाभते. छोट्या- मोठ्या गोष्टी सांगून आजोबा-आजींनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केलेले असतात. उत्तेजन देऊन त्यांनी छोट्यांचे गुणसंवर्धन आणि मनोरंजन केलेले असते. या दिवशी नातवंडांनी आजी-आजोबांच्या पाया पडून, त्यांचे मंगल आशीर्वाद प्राप्त करायचे असतात. या दिवसाला ‘आजी चतुर्थी’ किंवा ‘मातामह चतुर्थी’ किंवा ‘मोठी आई चतुर्थी’, असे म्हटले जाते.
पांडव पंचमी किंवा कडपंचमी
‘पांडव पंचमी’ किंवा ‘कडपंचमी’ हा दिवाळीचा समारोपाचा दिवस. सोनार, शिंपी, परीट, न्हावी, कुंभार अशा १२ बलुतेदारांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मी आणि अवजारे, हत्यारे, उद्योग साधने यांची पूजा करण्याचा दिवस. झेंडूच्या माळांनी दुकाने सजवून फटाके उडवण्याचा दिवस. दिवाळी कडेला गेली; म्हणून या दिवसाला ‘कडपंचमी’ असेही म्हणतात.
पांडव पंचमीला काही ठिकाणी गोठ्यात शेणाच्या गौळणी, ५ पांडव, कुंती यांच्या मूर्ती सिद्ध करून पूजतात. नव्या तांदुळाच्या खिरीचा त्यांना नैवेद्य दाखवतात. नंतर हे शेणाचे पुतळे वाळवतात आणि कार्तिक पौर्णिमेला त्यांच्या गोवर्या पेटवून त्यावर नव्या तांदुळाचा भात शिजवून शेतकरी मंडळी खातात. पांडवांना लाक्षागृहात जळून मरणाचे जे संकट त्यांच्यावर ओढवले, त्याची ही स्मृती असावी, असे म्हटले जाते.
पांडव पंचमीनंतर येणार्या दिवशी काही जण ‘घबाडषष्ठी’ साजरी करतात. ‘प्रपंच, शेती, व्यवसाय आणि नोकरी येथे प्रामाणिकपणे मनःपूर्वक केलेल्या कष्टाचे आपल्याला घबाड मिळावे’, या हेतूने हा दिवस साजरा केला जातो; पण हा दिवस दिवाळीच्या सणोत्सवात अंतर्भूत नाही.
– प्रा. रवींद्र धामापूरकर, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.
(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक २०११)