अनुग्रह झाला म्हणजे काय ? याविषयीचा साक्षात्कार !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

मी व्यवसायाने डॉक्टर. विशेष देवभक्त वगैरे नव्हतो. महाराज, गुरु वगैरे गोष्टींवर माझा फारसा विश्वासही नव्हता. एक दिवस मित्रासह गोंदवल्याला जायचा प्रसंग आला. दर्शनाच्या रांगेत उभा होतो, तर मला सांगण्यात आले, ‘अनुग्रह घेण्याची रांग आहे.’ माझ्या मनात विचार आले, ‘कसला अनुग्रह ? महाराज कुठे आहेत आता ? ते अनुग्रह कसा देणार ? जाऊ दे. आपल्याला काय करायचे आहे ?’ माझ्या समोरच एक वृद्ध आजोबा श्रद्धेने हातात नारळ, फुलांचा हार वगैरे घेऊन अनुग्रहासाठी उभे होते. नंतर ते अनुग्रह घेऊन अतिशय आनंदात ते आजोबा निघून गेले. आम्हीही दर्शन घेऊन बाहेर पडलो.

पुढे काही मासांनी माझ्या एका मित्राच्या रुग्णालयात रुग्ण तपासणीसाठी गेलो होतो. तेव्हा अतीदक्षता विभागात तेच आजोबा जे  मला त्या दिवशी अनुग्रह घेण्याच्या रांगेत दिसले होते. त्यांचा केवळ श्वास चालू होता. शरिराची हालचाल शून्य, ना ऐकू येत होते, ना बोलू शकत होते. मी चौकशी केल्यावर लक्षात आले की, त्यांची ही अवस्था गेले आठवडाभर आहे. शेवटचाच क्षण म्हणून सर्व नातेवाइकांना बोलावून घेतले होते. त्यातील एक जण एकदम म्हणाले, ‘अहो आजोबांची श्रीमहाराजांवर (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांवर) पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांना त्यांचे छायाचित्र बघून जाऊ दे त्यांना’, असे म्हणून एक जणांनी श्रीमहाराजांचे छायाचित्र आणून ते त्यांनी आजोबांपुढे धरले. ‘आबा बघा, महाराज आले आहेत तुम्हाला भेटायला’, असे तो म्हणाला आणि काय आश्चर्य पूर्ण पक्षाघात झालेली ती व्यक्ती ताडकन उठून बसली. आजोबांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांनी हात जोडले आणि ‘महाराज’ एवढा एकच शब्द उच्चारला अन् पुन्हा शांतपणे झोपले. पुढचा पाऊण घंटा आजोबा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा जप संथ लयीत करत राहिले. तो जप आम्ही सर्वांनी ऐकला. वैद्यकीय शास्त्राच्या आवाक्याबाहेरची अलौकिक घटना ! यानंतर आजोबांनी अखेरचा श्वास सोडला. त्या वेळी लक्षात आले, ‘अनुग्रह झाला, म्हणजे काय झाले !’

– डॉ. डी.डी. देशमुख कामठेकर, पुणे.

(साभार : ‘चैतन्यस्मरण’ त्रैमासिक (वर्ष १९९२))