श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) सांगतात, ‘सत्पुरुष त्यांच्या डोळ्यांवरून ओळखता येतो. जो अनुसंधानात आहे, त्याची नजर वस्तूंकडे असूनही पूर्ण लक्ष तेथे नसते. जो सिद्ध आहे, त्याची नजर लहान मुलासारखी निर्विकार असते. जो मुमुक्षु आहे, त्याची नजर आर्त असते. माणसाला झपाटणार्या कुवासना बहुतांशी डोळ्यांच्या द्वारे आत शिरतात. माणसाची वृत्ती त्याच्या डोळ्यांवरून कळते. एखाद्याची ‘दृष्टी वाईट आहे’, असे आपण म्हणतो. देहावसान होतांना प्रथम डोळे थिजतात. प्राण गेल्याबरोबर पापण्यांची उघडझाप बंद पडते. डोळ्यांचा उपयोग भगवंताचे दर्शन करण्यासाठी केला, तर त्याचे प्रेम लवकर येईल; म्हणून डोळ्यांचा वापर करतांना फार दक्षता ठेवावी. डोळ्यांना विकार झाला, तर तळपायांना काशाच्या वाटीने तेल चोळतात, कानांत तेल घालतात, त्यामुळे डोळे शांत होतात; म्हणून दृष्टी चांगली होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करावे आणि ते कानांनी ऐकण्याचा अभ्यास ठेवावा. यामुळे चित्त एकाग्र होण्यास साहाय्य होईल आणि दृष्टी स्वच्छ होईल.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)