सातारा, १ नोव्हेंबर (वार्ता.) – कृष्णा आणि उरमोडी नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे शेतीसाठी लागणार्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणातील पाणी चोरी झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा येथील सिंचन मंडळात आंदोलन करण्यात आले. या वेळी उरमोडी, कृष्णा नदी आणि कण्हेर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाण्याविषयी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकार्यांना प्रश्न विचारले. उरमोडी आणि इतर धरणांतून पाण्याची चोरी झाली आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
धरणातील पाण्यामुळे दुष्काळी भागातील तलाव भरून वहात आहेत. यामुळे धरणात पाणीसाठा अल्प प्रमाणात शिल्लक राहिला आहे. कृष्णा आणि उरमोडी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामधील विद्युत् मोटारी उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिकांना पाणी अल्प पडत आहे. अल्प पाऊस झाल्याने धरणामध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. पाण्याची सतत चोरी होत राहिल्यास लाभधारक शेतकर्यांना पाणी पुरणार नाही. परिणामी शेतकर्यांच्या पिकांची हानी होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागणार आहे. शेतीसाठी काढलेले कर्जही भागवता येणार नाही. यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते; मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना शांत केले.