बेळगाव येथे ‘काळा दिना’च्‍या कार्यक्रमासाठी जाणार्‍या ठाकरे गटाच्‍या कार्यकर्त्‍यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले !

‘काळा दिन’ पाळण्‍यासाठी जमलेला जनसमुदाय

कागल (जिल्‍हा कोल्‍हापूर) – कर्नाटक राज्‍यात मराठी भाषिकांच्‍या वतीने १ नोव्‍हेंबर हा ‘काळा दिन’ पाळण्‍यात येतो. या दिवसाला उपस्‍थित रहाण्‍यासाठी ठाकरे गटाचे कोल्‍हापूर जिल्‍हाध्‍यक्ष विजय देवणे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कर्नाटक राज्‍यात जात होते. या वेळी त्‍यांना महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमेवर कागल येथे दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी अडवले. या प्रसंगी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्‍यात झटापट झाली. कर्नाटक राज्‍यात जाऊ न दिल्‍याच्‍या निषेधार्थ कार्यकर्त्‍यांनी महामार्गावरच ठिय्‍या आंदोलन केले. यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या प्रसंगी विजय देवणे म्‍हणाले, ‘‘कर्नाटक राज्‍यात सरकार कुणाचेही असले, तरी मराठी भाषिकांवर नेहमीच दडपशाही केली जाते. वास्‍तविक सीमा समन्‍वय मंत्र्यांनी कर्नाटकात जाऊन मराठी भाषिकांना दिलासा देणे आवश्‍यक होते; मात्र कुणीही आले नाही, हे दुर्दैव आहे.’’