ISRO Gaganyaan : ‘इस्रो’च्या ‘गगनयान’ मोहिमेतील महत्त्वाची चाचणी यशस्वी !

तांत्रिक बिघाडानंतर काही मिनिटांतच अवकाश यानाच्या आपातकालीन सुटकेची करण्यात आली चाचणी !

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’च्या ‘गगनयान’ मोहिमेच्या अंतर्गत अंतराळवीर ज्या अवकाश यानातून अंतराळात जाणार आहेत, त्या यानाच्या आपातकालीन सुटकेची चाचणी २१ ऑक्टोबर या दिवशी येथील कॅप्टन सतीश धवन केंद्रावर घेण्यात आली. इस्रोची ही चाचणी यशस्वी ठरली. अपेक्षेप्रमाणे चाचणीसाठी नियोजित केलेले आपातकालीन सुटकेचे सर्व टप्पे पूर्ण झाल्याचे या वेळी घोषित करण्यात आले. आता गगनयानची आणखी एक चाचणी पुढील काही महिन्यांत केली जाणार आहे. प्रत्यक्ष अतंराळवीर अवकाशात पाठवतांना उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाणानंतर काही मिनिटांत तांत्रित बिघाड झाला, तर रॉकेटच्या अग्रभागावर असेलल्या अवकाश यानातील अंतराळवीरांना पुन्हा सुखरूप भूमीवर आणणे हे शक्य होणार आहे.

अवकाश यान हे रॉकेटच्या अग्रभागावर असते. जर उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाण झाल्यावर रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला, तर रॉकेटचा लगेचच स्फोट होण्याची शक्यता असते. याचे कारण असे की, रॉकेटमध्ये कित्येक सहस्र टन अत्यंत ज्वलनशील इंधन असते. अशा वेळी अवकाशयानातील अंतराळवीरांची सुरक्षा महत्त्वाची ठरते. तेव्हा हे अवकाश यान लगेचच मुख्य रॉकेटपासून वेगळे होत दूर जात सुखरूप पृथ्वीवर परतण्याचे नियोजन असते.

सौजन्य: ISRO Official

‘गगनयान’ मोहिमेत ३ अंतराळवीर पृथ्वीपासून ४०० कि.मी. अंतरावर जाणार !

‘गगनयान’मध्ये, ३ सदस्यांचे पथक ३ दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या ४०० कि.मी. वरच्या कक्षेत पाठवले जाईल. यानंतर या यानाचे क्रू मॉड्युल (पथक असलेले अवकाश यान) समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. जर भारत आपल्या मोहिमेत यशस्वी झाला, तर असे करणारा तो चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, चीन आणि रशिया यांनी असे केले आहे.

या मोहिमेसाठी इस्रो ४ अंतराळवीरांना प्रशिक्षण देत आहे. बेंगळुरू येथे स्थापन केलेल्या अंतराळवीर प्रशिक्षण सुविधेत वर्ग प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती प्रशिक्षण, सिम्युलेटर प्रशिक्षण, तसेच फ्लाईट सूट प्रशिक्षण दिले जात आहे.