गोवा : मडगाव येथे अस्वच्छ वातावरणात असलेल्या आणि नोंदणी नसलेल्या अन्नपदार्थ उत्पादन केंद्रावर धाड

राजधानी एक्सप्रेसला करत होते अन्नपुरवठा

अस्वच्छ वातावरणात असलेली अन्न बनवण्यात येणारी भांडी

मडगाव – रावणफोंड, मडगाव येथील मेसर्स बृंदावन फूड्स या राजधानी एक्सप्रेस या रेल्वेला अन्न पुरवणार्‍या अन्नपदार्थ केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी २७ सप्टेंबरला तपासणी केली. या वेळी त्यांना हे केंद्र अस्वच्छ आणि अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAIच्या) नोंदणीविना कार्यरत असल्याचे आढळले. या केंद्राची यापूर्वीही तपासणी करण्यात आली होती आणि अन्नपुरवठा व्यवसाय करणार्‍यांना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि २९ सप्टेंबरला पुन्हा तपासणी केली असता ते त्याच अस्वच्छ परिस्थितीत कार्यरत आढळले. या केंद्राला सध्या अन्नपुरवठा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याविषयी मालकांवर देखील गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.

दक्षिण गोव्यातील अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी एबेल रॉड्रिग्स आणि अन्न सुरक्षा अधिकारी स्नेहा नाईक, केने कार्व्हालो अन् अभिषेक नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली.