शिवसेनेच्‍या आमदारांनी विधानसभा अध्‍यक्षांकडे सादर केले ६ सहस्र पानांचे लेखी उत्तर !

शिवसेनेतील आमदार अपात्रतेचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्‍या वतीने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली होती; मात्र या प्रकरणी स्‍पष्‍ट निकाल न देता हे प्रकरण विधानसभा अध्‍यक्षांकडे सोपवण्‍यात आले होते. तेव्‍हापासून या प्रकरणी काय कारवाई होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आता या प्रकरणात शिंदे यांच्‍यासह शिवसेनेच्‍या आमदारांनी विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांच्‍याकडे ६ सहस्र पानांचे लेखी उत्तर सादर केले आहे. या प्रकरणी ‘आपण लवकरच निर्णय घेणार आहोत’, असे विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

विधानसभा अध्‍यक्षांचे अधिकार अबाधित ठेवत सर्वोच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणी निर्णय घेण्‍याचे निर्देश विधानसभा अध्‍यक्षांना दिले होते; मात्र नार्वेकर यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्‍यामुळे ठाकरे गटाने पुन्‍हा सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्‍यक्षांनी शिवसेनेच्‍या दोन्‍ही गटांच्‍या आमदारांना आपली भूमिका मांडण्‍यासाठी नोटीस पाठवली होती. विधानसभा अध्‍यक्षांच्‍या नोटिशीनंतर ठाकरे गटाकडून उत्तर सादर करण्‍यात आले होते; पण शिंदे गटाच्‍या आमदारांनी विधानसभा अध्‍यक्षांच्‍या नोटिशीला उत्तर देण्‍यासाठी आणखी मुदत मागितली होती. त्‍यामुळे अपात्रतेची सुनावणी आणखी पुढे ढकलली होती. आता हे उत्तर सादर करण्‍यात आले आहे.