पंचनाम्‍यात नमूद केल्‍याप्रमाणे ‘वस्‍तू आक्षेपार्ह नाहीत’, म्‍हणजे काय ?, यावर उलटतपासणी उत्तर देण्‍यास पंच असमर्थ !

कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरण

कोल्‍हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड यांच्‍या घराचा घरझडती पंचनामा करण्‍यात आला. यात सांगली येथील पंच सत्‍यजित गुरव यांनी ‘कपाटात आक्षेपार्ह वस्‍तू आढळून आल्‍या नाहीत’, असा उल्लेख पंचनाम्‍यात केला होता. या संदर्भात ‘आक्षेपार्ह म्‍हणजे काय ? त्‍याचा मापदंड काय ? आक्षेपार्ह नसलेल्‍या म्‍हणजे काय, हे तुम्‍हाला पोलिसांनी सांगितले होते का ?’, असे प्रश्‍न अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी सत्‍यजित गुरव यांना विचारले असता गुरव यांनी ‘मी तसे काही विचारले नाही’, असे सांगितले. ‘असे असेल, तर ते वाक्‍य पंचनाम्‍यात कसे आले ?’ असे अधिवक्‍ता समीर पवटर्धन यांनी विचारल्‍यावर पंच सत्‍यजित यांना त्‍याचे उत्तर देता आले नाही. त्‍यामुळे ‘सत्‍यजित गुरव हे पंच पोलिसांना साहाय्‍य करण्‍यासाठी साक्ष देत आहेत, हेच सिद्ध होते’, असे अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले.

कॉ. गोविंद पानसरे हत्‍येच्‍या प्रकरणाची सुनावणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्‍यासमोर चालू आहे. १६ सप्‍टेंबर २०१५ या दिवशी जेव्‍हा संशयित समीर गायकवाड यांच्‍या घराची घरझडती घेण्‍यात आली, त्‍या वेळी सांगली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात त्‍या वेळी लिपिक म्‍हणून कार्यरत असणारे पंच सत्‍यजित गुरव यांची साक्ष घेण्‍यात आली. सरकार पक्षाच्‍या वतीने अधिवक्‍ता हर्षद निंबाळकर आणि अधिवक्‍ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले.

अधिवक्‍ता समीर पटवर्धन, इचलकरंजी येथील ज्‍येष्‍ठ अधिवक्‍ता अनिल रुईकर, अधिवक्‍ता डी.एम्. लटके यांनीही उलट तपासणी घेतली. या प्रसंगी अधिवक्‍ता आदित्‍य मुद़्‍गल, अधिवक्‍ता सारंग जोशी, अधिवक्‍त्‍या स्नेहा इंगळे, अधिवक्‍त्‍या अनुप्रिता कोळी, अधिवक्‍त्‍या प्रीती पाटील उपस्‍थित होत्‍या. या खटल्‍यात एकूण १२ संशयित आरोपी असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ सप्‍टेंबरला होणार आहे.

या प्रसंगी अधिवक्‍ता अनिल रुईकर यांनी उलटतपासणीत पंच सत्‍यजित गुरव यांनी दिलेली साक्ष आणि प्रत्‍यक्षात असलेली वस्‍तूस्‍थिती यांतील फोलपणा उघड केला. अधिवक्‍ता अनिल रुईकर यांनी पंच सत्‍यजित हे पंचनाम्‍यासाठी येतांना त्‍यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील त्‍यांचा कामाचा लेखी ‘चार्ज’ संबंधितांना दिला नाही, जप्‍त करण्‍यात आलेले विविध भ्रमणभाष संच ते जप्‍त करण्‍यापूर्वी चालू आहेत कि बंद आहेत ? याची निश्‍चिती केली नाही, तसेच जप्‍त करण्‍यात आलेल्‍या ‘डायरी’मधील नोंदी पंचनाम्‍यात नमूद केल्‍या नाहीत, हे उघड करून पंचांच्‍या साक्षीतील अनेक विसंगती न्‍यायालयासमोर उघड केल्‍या.

समीर गायकवाड यांच्‍या घरातून ज्‍या वस्‍तू जप्‍त करण्‍यात आल्‍या, त्‍यात ‘भगवद़्‍गीता’ होती. ‘भगवद़्‍गीता’ जप्‍त करतांना मनाला वेदना झाल्‍या का ?’ असा प्रश्‍न अधिवक्‍ता अनिल रुईकर यांनी पंच सत्‍यजित यांना विचारल्‍यावर त्‍यांनी ‘काही वाटले नाही’, असे उत्तर दिले.