सहकार्यातून व्‍यावसायिक प्रगतीकडे !

‘शिक्षण ते नोकरी-व्‍यवसाय’, असा साधारणपणे व्‍यावसायिक वाटचालीचा क्रम असतो. कुणी अभ्‍यासात हुशार असतो, तर कुणी जेमतेम असतो, तर काही जण ‘ढ’ असतात. अभ्‍यासक्रम एकच असतो; पण प्रत्‍येकाची आवड आणि आकलनशक्‍ती भिन्‍न असल्‍याने साहजिकच त्‍यानुसार परीक्षेच्‍या गुणांत त्‍याचे पडसाद दिसतात. ज्‍यांची आकलनशक्‍ती दांडगी आहे, ते उत्तम शैक्षणिक प्रगती करत पुढे जातात. त्‍यांना त्‍या आधारे नामांकित आस्‍थापनांत गलेलठ्ठ वेतनाची नोकरी मिळते. त्‍यामुळे सामाजिक दृष्‍टीने विचार करता त्‍यांचे व्‍यावसायिक जीवन चांगल्‍याप्रकारे मार्गी लागते. हे सर्व सांगण्‍याचे कारण हेच की, समजा मी जर शालेय-महाविद्यालयीन शिक्षणात हुशार होतो, तर मी माझ्‍या मित्र-मैत्रिणींनाही व्‍यावसायिक स्‍तरावर पुढे आणण्‍यासाठी प्रयत्न केले का ? दुसरे सूत्र असे की, मी आतापर्यंत ज्‍या शाळा-महाविद्यालयांतून शिकलो, तेथील विशेषतः इयत्ता १० वी, १२ वी आणि पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना शिक्षण अन् नोकरी यांत प्रगती करण्‍यासाठी अधिक चांगल्‍याप्रकारे काय करता येईल ? हे स्‍वतःला आलेल्‍या अनुभवांतून सांगितले आहे का ? या प्रश्‍नांची उत्तरे ‘जवळजवळ नाही’ असेच असते.

‘पुढचे पाठ आणि मागचे सपाट’ म्‍हणतात ते हेच. आपण केलेल्‍या सहकार्याने विद्यार्थ्‍यांना बाजारात काय चालू आहे ? त्‍या दृष्‍टीने पुढील वाटचाल ठेवणे सोपे होत असते. यातूनच कुठेतरी बेरोजगारीच्‍या समस्‍येवर आशेचा किरण मिळाल्‍याने कित्‍येक पालक-विद्यार्थी यांच्‍या मनावरील नोकरी संदर्भातील ओझे हलके होऊ शकते. हातात पदवी आहे; पण पुढची दिशा जर अस्‍पष्‍ट असेल, तर व्‍यक्‍ती हिरमुसते. यातून विद्यार्थ्‍यांना बाहेर काढणे आवश्‍यक आहे. केवळ स्‍वतःचा विचार न करता इतरांचाही विचार केल्‍यास आपसूकच स्‍वतःत व्‍यापकत्‍वाचे बीज रुजण्‍यास साहाय्‍य होईल.

एखाद्या मार्गावर नेमकेपणाने कशी वाटचाल करायची ?, याची कल्‍पना असेल, तर मार्गक्रमण करतांना ताण येत नाही, तसेच भरकटण्‍याचे भयही उरत नाही. आजमितीस अनेकांना योग्‍य वाटचाल करण्‍याविषयी अज्ञान आहे. त्‍यामुळे ते वर्षानुवर्षे भरकटत रहातात. याच सूत्राला प्रतिबंध घालण्‍यासाठी शाळा-महाविद्यालयांतील माजी विद्यार्थ्‍यांनी ते शिकलेल्‍या शैक्षणिक संस्‍थांतील विद्यार्थ्‍यांना वेळोवेळी कौशल्‍य विकासाच्‍या दृष्‍टीने मार्गदर्शन केल्‍यास बाजारात नवीन असणार्‍या या विद्यार्थ्‍यांना दिशा मिळेल आणि त्‍यांचा आत्‍मविश्‍वासही वाढेल.

– श्री. जयेश राणे, मुंबई.