दिव्यांग शाळांमधील बनावट नोकरभरती आणि ना-हरकत प्रमाणपत्रे यांविषयी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करणार ! – शंभूराज देसाई, मंत्री

शंभूराज देसाई

मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – राज्यातील दिव्यांग शाळांमधील बनावट नोकरभरती आणि ना हरकत प्रमाणपत्र यांसाठी जे अधिकारी दोषी असतील त्यांची १ मासात चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याविषयी कुठल्याही अधिकार्‍यांना पाठीशी घालण्यात येणार नाही, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. हा तारांकित प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.

मंत्री देसाई म्हणाले की, कल्याण आणि पुणे येथील आयुक्तांनी जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ या कालावधीत ना-हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र यांचे नूतनीकरण आणि दिव्यांगांच्या शाळांना अनुदानाच्या शिफारशींच्या प्रकरणामध्ये झालेल्या वित्तीय आणि प्रशासकीय अनियमिततेविषयी संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. दिव्यांगांना ‘शासन आपल्या दारी’ या योजनेंतर्गत घरपोच दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्या अनुषंगाने आवश्यक ते दाखले वाटण्यात येत आहेत.