|
कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाला ३२ लाख रुपयांची हानी झाली आहे. ४ सहस्र ३८४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. १०३ गावातील उच्च आणि लघु दाब वाहिन्यांचे १४३ खांब आणि ११ रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) पडले आहेत, अशी माहिती महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी दिली.
खोबरे यांनी पुढे सांगितले की,
१. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महापूर आणि अतीवृष्टी यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात सर्वत्र पसरलेल्या महावितरणच्या यंत्रणेला या आपत्तीचा सामना करावा लागत आहे. महावितरणचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि कणकवली २ विभाग असून या विभागांतील उपरोक्त हानी आहे.
२. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन काम केले. अद्यापपर्यंत जनमित्रांनी युद्धपातळीवर काम करून १०९ उच्च आणि लघु दाब वीजवाहिनीचे खांब, ९ वितरण रोहित्रांची पुन्हा उभारणी करून ४ सहस्र ३०० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत् केला आहे.
३. ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी वीज कर्मचारी काम करत आहेत, तरी नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे.