रत्नागिरी – तालुक्यातील आंबा आणि काजू शेतकरी २५ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. आंबा, काजू, फळबागायतदार, शेतकरी, छोटे व्यवसायिक यांची विनाअट संपूर्ण कर्ज मुक्ती सरसकट झालीच पाहिजे. कोकणातील प्रदूषण कारखाने बंद झालेच पाहिजे. कर्जदार शेतकर्यांचे ७/१२ चे उतारे कर्जमुक्त झालेच पाहिजे. शेतकर्यांच्या फळबागायतीचे विम्याचे निकष पालटलेच पाहिजेत.
वर्ष २०१४-१५ या वर्षापासून २०२३-२४ पर्यंत सर्व शेतकर्यांचे व्याज आणि पुढील वर्षांसाठी ४ टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. शेतकर्यांचा कृषीपंप आणि घरगुती मीटरचे दर अल्प करण्यात यावेत. खते, औषधांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत, त्यांचा ‘जीएस्टी’ कर माफ करावा किंवा शेतकर्याने खते आणि औषधे खरेदी केलेल्या देयकावर शासनाने अनुदान द्यावे. आंब्याच्या, तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा करण्यात यावी.
*Ratnagiri : आंबा, काजू फळबागायतदार आणि शेतकऱ्यांचे २५ जुलै रोजी आंदोलन*https://t.co/UC0vSW50mo pic.twitter.com/k9S0ZuRhYC
— Tarun Bharat News (@tbdnews) July 21, 2023
आंबा बागायतदार, शेतकरी, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या सोबतीने काम करणारे कामगार ( महिला आणि पुरुष ) यांना जीवन अन् आरोग्य विमा संरक्षण मिळावे. (शेत किंवा बाग यांमध्ये काम करत असतांना सर्पदंश, जंगली श्वापदे, झाडावरून पडणे, फवारणी करतांना विषबाधा, हृदयविकार इ. मुळे मृत्यू आल्यास दोन्ही विमा संरक्षण मिळावे.) या आणि अन्य प्रश्नांसाठी शेतकर्यांमार्फत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाचे आयोजन कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सह. संस्था, रत्नागिरी; जिल्हा हापूस आंबा सह. संस्था; मंगलमूर्ती आंबा उत्पादक सह. संस्था, आडीवरे; पावस परिसर आंबा सह. संस्था, पावस विभाग; ओबीसी संघर्ष समन्वय समिती; रत्नागिरी-बहुजन विकास आघाडी आदी संस्थांचे पदाधिकारी आंबा बागायतदार शेतकरी यांनी केले आहे.